पुत्राजय : तुरुंगात असलेले मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या प्रकरणात उच्च न्यायालयाने आज दोषी ठरवले. मलेशियाच्या एमडीबी सरकारी गुंतवणूक निधीमधील अब्जावधी डॉलरचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर खटला चालवला गेला होता. अधिकारांचा गैरवापर करण्याच्या ३ आरोपांमध्ये नजीब यांना आज दोषी ठरवण्यात आले. त्यांच्यावर ठेवलेल्या काही अतिरिक्त आरोपांवरील सुनावणी अद्याप सुरू आहे. नजीब यांनी एमडीबी फंडमधून ७०० दशलक्ष डॉलर आपल्या वैयक्तिक बँक खात्यात वळवले, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नजीब हे २००९ ते २०१८ पर्यंत मलेशियाचे पंतप्रधान होते. एमडीबी गैरव्यवहाराशी संबंधित पूर्वीच्या एका प्रकरणात दोषी ठरल्यानंतर ते सध्या तुरुंगवास भोगत आहेत. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळेच २०१८ मध्ये नजीब यांच्या सरकारचा पराभव झाला होता. सत्तेचा गैरवापर, गुन्हेगारी विश्वासघात आणि एमडीबीची माजी युनिट असलेल्या एसआरसी इंटरनॅशनलमधून ४२ दशलक्ष रिंगिट (१०.३ दशलक्ष डॉलर) आपल्या खात्यात वळवल्याबद्दल त्यांना २०२० मध्ये १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर २०२२ मध्ये त्यांच्या शिक्षा भोगण्यास सुरुवात झाली. तुरुंगवास सुनावण्यात आलेले ते मलेशियाचे पहिले माजी नेते ठरले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, २००९ ते २०१४ दरम्यान, नजीब यांच्या निकटवर्तीय असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी सरकारी गुंतवणूक निधीतून ४.५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम लुटली आणि अमेरिका, सिंगापूर आणि स्वित्झर्लंडसह इतर देशांमध्ये या पैशाची अफरातफर केली.