PCMC 52 Crore Scam : ‘त्या’ ५२ कोटींच्या घोटाळ्यात बडे मासे अडकणार? कामठेंनी केली सीबीआय चौकशीची मागणी
PCMC 52 Crore Scam : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५२ कोटींचा लेखा घोटाळा; राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) सीबीआय चौकशीची मागणी.

PCMC 52 Crore Scam – पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार, नियमबाह्य कंत्राटे, बोगस निविदा प्रक्रिया व पदांचा गैरवापर केल्याच्या घटना समोर येत आहेत. आता तब्बल ५२ कोटी रुपयांचा घोटाळा लेखा विभागात झाला आहे. याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
५२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी, कंत्राटदारांनी आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीशी संबंधित काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून वरिष्ठ अधिकारी, निर्णय घेणारे प्रशासकीय प्रमुख, संबंधित कंत्राटदार आणि भारतीय जनता पार्टीचे संबंधित पदाधिकारी यांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे.
महापालिकेतील अनेक महत्त्वाच्या निविदा, विकासकामे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तींना लाभ मिळाल्याचे आरोप वारंवार होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची, आमदार, माजी पदाधिकाऱ्यांची, संबंधित लोकप्रतिनिधींची तसेच महापालिका अधिकाऱ्यांची भूमिका तपासणे आवश्यक आहे. महापालिकेतील मागील पाच वर्षांतील सर्व प्रमुख आर्थिक व्यवहार, कंत्राटे, निविदा प्रक्रिया व नियुक्त्यांची चौकशी करण्यात यावी.
भाजपशी संबंधित स्थानिक पदाधिकारी, माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व त्यांच्या निकटवर्तीयांच्या भूमिकेची चौकशी करावी. दोषी अधिकारी, कंत्राटदार, राजकीय पदाधिकारी व संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. करून कठोर कारवाई करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना व संबंधित सत्तारूढ पदाधिकारी यांना सर्व पदांवरून दूर करण्यात यावे, अशी मागणी कामठे यांनी केली आहे.





