Asim Sarode : या ६ गोष्टी ठाकरेंच्या बाजूने ; शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर वकील असीम सरोदेंनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं
Asim Sarode : या युक्तिवादावर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

Asim Sarode : शिवसेना चिन्ह आणि पक्ष यासंदर्भातील सुनावणी सर्वेाच्च न्यायालयात सुरू आहे. ठाकरे गटाची बाजू कोर्टाने ऐकल्यानंतर आता शिंदे गटाकडून काल जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटाकडून करण्यात आलेले दावे शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी खोडून काढले. आमदार आणि खासदारांनी वेगळी भूमिका घेणं म्हणजेच पक्षातील राजकीय फूट होती, असा महत्वाचा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला. या युक्तिवादावर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
युक्ती चांगली आहे पण त्याला युक्तिवाद म्हणता येणार नाही अश्या सुमार पद्धतीने तोंडातून वाफ दवडली जातेय आणि कोर्टाचा वेळ वाया घालविला जातोय. असं म्हणत घटनाक्रम, वस्तुस्थिती, कायदा, दहावे परिशिष्ट, सिम्बॉल नियम, संविधान अश्या सहा गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत, असं विधान असीम सरोदे यांनी केलं आहे. यासंदर्भात सरोदे यांनी शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या सुनावणीवर भाष्य करणारी पोस्ट एक्सवरुन शेअर केली आहे.
शिंदे गटाकडून कोणता दावा करण्यात आला?
शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेत काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी आमदार आणि खासदारांनी वेगळी भूमिका घेतली. आमदार आणि खासदारांनी वेगळी भूमिका घेणं म्हणजेच पक्षातील राजकीय फूट होती, असा युक्तिवाद केला. त्यामुळे आता पुढील सुनावणीत काय होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदेच्या गटाचीच शिवसेना आहे हे सांगण्यासाठी त्यांच्या वकिलांना निवडणूक आयोगाची बाजू कशी बरोबर आहे हे सांगावे लागत आहे. इलेक्शन कमिशनने नियुक्त केलेले वकील वेगळे आहेत तरी शिंदेंच्या वकिलांना इलेक्शन कमिशन च्या कृतीचे समर्थन करून स्वतःची बाजू बरोबर आहे असे सांगावे लागतेय…
— Asim Sarode (@AsimSarode) September 15, 2026
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी संविधानाच्या दहाव्या अनुसूचीअंतर्गत शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता.
या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासोबतच, एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्याचा आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णयालाही न्यायालयासमोर आव्हान देण्यात आले आहे.
Kas Pathar: रंगीबिरंगी फुलांचा कास पठारावर गालिचा; सुट्यांमुळे पर्यटकांची झुंबड






