ZP Election: झेडपी-पंचायत समितीसाठी इच्छुकांची ‘फिल्डिंग’ सुरू; वाई तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीमध्ये काट्याची टक्कर

प्रभात वृत्तसेवा
भुईंज – वाई नगरपालिका निवडणुकांनंतर आता ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची भाऊगर्दी दिसत असून तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय पक्ष कामाला लागले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्कल डोळ्यासमोर ठेवून नेतेमंडळींनी संवाद दौरे सुरू केले आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोनच पक्षात काट्यांची टक्कर पाहावयास मिळणार आहे.
संभाव्य उमेदवार आपापल्या पक्षाकडे फिल्डिंग लावत असतानाच पक्षही विविध फंडे वापरत योग्य उमेदवार कोण? राहील याची चाचपणी करत आहेत. ग्रामीण भागात सध्या भावी ‘झेडपी मेंबर’ कोण? पंचायत समिती सदस्य कोण? याचे आखाडे बांधण्यास सुरुवात झाली असून यासंबंधीच्या हालचाली अधिक गतिशील झालेल्या आहेत. वाई नगरपालिकेतील हारजीत बाजूला ठेवत नवी रणनीती ठरवली जात आहे.
वाई तालुक्यात ९९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातून जिल्हा परिषदेसाठी चार सदस्य, पंचायत समिती साठी आठ सदस्य निवडले जाणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपने संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केली असून नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद बैठकावर भर दिला जात आहे.
ना. मकरंद पाटलांचा सभांचा धडाका
नामदार मकरंद पाटील यांनीही वाई तालुक्यातील असणाऱ्या चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने तालुक्यात विशेष लक्ष दिले आहे. ‘बारा झिरो’ करणार असल्याचे त्यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना सांगत जोमाने लागला कामाला लागण्याचा संदेश दिले आहेत. ग्रामीण भागात पक्षाची पकड मजबूत करून उमेदवार निश्चितीवर त्यांचा भर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मदनदादा भोसलेही रणांगणात
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने गट गण निहाय रणनीती आखण्यास सुरुवात केली असून योग्य उमेदवारांचा शोध सुरू आहे. विशेषतः माजी आमदार मदनदादा भोसले निवडणूका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना चार्ज करताना दिसत आहेत. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवून जिंकायचा चंग त्यांनी मनाशी बांधला आहे. वाई नगर परिषदेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदावर भाजपने विजयश्री मिळवल्याने भाजपचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या आठ जागांसाठी पक्षनिहाय मुलाखती सुरू झाल्या आहेत.





