ZP Election : आरक्षण जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा स्फोट! स्टेटस, पोस्ट्स, आणि बॅनरबाजीने माहोल तापला

प्रभात वृत्तसेवा
कान्हे – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाचा दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेला निर्णय अखेर जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवस आरक्षण जाहीर होण्याची वाट पाहत असलेल्या कार्यकर्त्यांनी आता आपल्या गणामध्ये राजकीय चढाओढीची तयारी सुरू केली आहे.
आरक्षण जाहीर होताच, सोशल मीडियावर इच्छुकांची पोस्ट, स्टेटस आणि बॅनरबाजीचा अक्षरशः पाऊस पडू लागला आहे. आमचा नेता लय पावरफुल, तयारीला लागा, अशा घोषणा आणि गाण्यांच्या तालावर अनेकांनी आपली राजकीय इच्छुकता जाहीर केली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप ग्रुप्सवर कार्यकर्त्यांच्या पोस्ट्स आणि शुभेच्छा संदेशांची रेलचेल दिसत आहे.
कित्येक कार्यकर्त्यांनी आपण आपल्या गणामध्ये इच्छुक आहोत, अशा शब्दांत स्टेटस पोस्ट करून निवडणुकीच्या रणधुमाळीचा शंख फुंकला आहे. काही ठिकाणी समर्थकांनी नेत्यांचे बॅनर, फोटो आणि स्लोगनसह सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. विकासाचा चेहरा, सर्वसामान्यांचा नेता अशा टॅगलाईन्ससह अचानक अनेक नवीन चेहरे पुढे येताना दिसत आहेत.
यामुळे निवडणुकीचा माहोल आता डिजिटल माध्यमांतून रंगू लागला असून, सोशल मीडियावरचा हा राजकीय उत्सवच कार्यकर्त्यांच्या जोशात अधिक भर घालत आहे. स्थानिक पातळीवरही आता पुढील निवडणूक लढतीसाठी चर्चा, गटबाजी आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.
सोशल मीडियावर दिसणारे उत्सवी वातावरण निवडणुकीची रंगतदार सुरुवातच आहे. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच खरी लढत दिसेल, मात्र सध्या तरी कार्यकर्त्यांनी मैदान गाजवायला सुरुवात केली असल्याचे चित्र सध्या सोशल मिडीयावर दिसत आहे.





