ZP Election 2026: मला नाही, तर तुला पण नाही! राहू गटात भावकी-गावकीचे अजब समीकरण; दिग्गज पेचात

प्रभात वृत्तसेवा
राहू – राहू (दौंड) संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद व तालुका पंचायत समित्यांचा फिव्हर चढत असताना राहू – खामगाव हे देखील याला अपवाद नाही. परंतु हा गट सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. राहू – खामगाव गट हा आमदार कुल यांचा बालेकिल्ला आहे. त्या मुळे भाजपकडून येथे तिकिटासाठी खूप मोठी स्पर्धा आहे आणि त्यात जिल्हा परिषदेची जागा ही सर्वसाधारण आल्यामुळे तर इच्छुकांची संख्या ही गगनाला भिडलेली आहे.
या जिल्हा परिषद गटामध्ये राहू व खामगाव ही दोन मोठी गावे लोकसंख्येच्या मानाने मोठी आहेत. त्यातल्या त्यात राहूचा वरचष्मा आहे. त्यामुळे राहूतील अनेक मातब्बर मंडळी ही गावकी व भावकीच्या व पाहुण्या रावळ्यांच्या जोरावर तिकिटासाठी वातावरण तयार करू लागले आहेत.
परंतु दरम्यानच्या काळात यातील अनेक मंडळींना हे लक्षात आले की, आपण कितीही तयारी केली तरी आपला तिकिटासाठी निभाव लागणार नाही. म्हणून यातील अनेक मंडळींनी “मला नाही,तर तुला पण नाही”या उक्तीप्रमाणे प्रयत्न करून दबावाचे राजकारण करायला सुरुवात केली.
याचा परिणाम असा झाला की तिकिटाचा कल हा तिसऱ्याच व्यक्तीच्या बाजूला झुकला.या मध्ये रोज एकत्र बसणाऱ्या परंतु भावकी वेगळी असणाऱ्या मंडळींनी आपल्याच बैठकीतील मित्रांसमोर आतून अडचणी उभ्या केल्याचे समोर आले आहे.
केवळ चाय पे चर्चा..
वेगवेगळ्या आडनावांची परंतु पाहुणे रावळे असलेली व कट्टर मैत्री असणाऱ्या अनेकांनी तिकीट आमच्या भावकीला नाही. तर समोरच्या मित्राच्या भावकीला मिळू नये म्हणून गावकी भावकीचा दबाव टाकून तिकीट दुसऱ्याच अनपेक्षित व्यक्तीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थात हे सर्व होत असताना कोणी कोणापुढे कशा अडचणी उभ्या केल्या, हे माहीत असताना देखील निखळ मैत्रीमुळे ही मंडळी रोज या विषयावर चाय पे चर्चा करत आहेत.




