प्रभात वृत्तसेवा कामशेत (चेतन वाघमारे ) – निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच मावळ तालुका राजकीय रंगाने रंगताना दिसतो आहे. आगामी निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी इच्छुक उमेदवार आता सरळ लाखोंच्या खर्चात वाढदिवस, स्वागत समारंभ, सत्कार सोहळे असे विविध कार्यक्रम आणि उत्सव साजरे करताना दिसत आहेत. बॅनर्स, पोस्टर्स, स्टेज शो, फटाके आणि शोभायात्रा यामुळे तालुक्यातील वातावरण उत्सवी बनले आहे. विविध पक्षांच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक हालचाली सुरू केल्या असून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याआधीच आपली लोकप्रियता दाखवण्यासाठी अनेकांनी लाखोंचा खर्च केला आहे. मात्र या ऐश्वर्यशाली जल्लोषामागे सर्वसामान्य मतदार जनतेच्या मनात एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे, एवढा पैसा उधळणारे उमेदवार खरंच निवडून आल्यानंतर जनतेची कामे करतील का, की केवळ सत्तेच्या मोहापोटी एवढा खर्च होत आहे..? असा सवाल जागृत मतदारवर्ग आता विचारू लागला आहे. निवडणुका पैशावरच लढवल्या जातात का आणि पैसा असेल तरच निवडणुकीला उभं राहता येतं का? हा प्रश्न चौकाचौकात, सार्वजनिक ठिकाणी, चहाच्या टपऱ्यांवर आणि सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय बनला आहे. जनतेच्या प्राथमिक गरजा जसे की, पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि शिक्षण याकडे लक्ष देण्याऐवजी इच्छुक फटाक्यांच्या आतषबाजीने आपली ताकद दाखवत आहेत, असे तालुक्यातील मतदारांचे म्हणणे आहे. मतदारांच्या अपेक्षा.. मतदारवर्गाकडून अशा खर्चिक प्रचाराला थोडासा विरोधही दिसून येत आहे. पैसा फुंकण्याऐवजी गावात एखादा रस्ता केला असता, शाळेला एखादी सोय करून दिली असती तर बरे झाले असते, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापणार यात शंका नाही. सध्या सुरू असलेला जल्लोष, शोभायात्रा आणि विविध कार्यक्रम पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहेत. परंतु या साऱ्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनातील प्रश्न अद्याप कायम आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर लक्ष.. यावर्षी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा रस्सीखेच अधिकच रंगणार आहे. विविध पक्षांच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक हालचाली सुरू केल्या असून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याआधीच आपली लोकप्रियता दाखवण्यासाठी अनेकांनी लाखोंचा खर्च केला आहे.