मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीनंतर अखेर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.
पण गेल्या महिन्याभरापासून या सिनेमावर बहिष्कार घाला अशी मोहिम चालवणारा एक वर्ग सोशल मीडियावर जोरदार ऍक्टिव्ह झाला होता. पण बहिष्काराची भाषा करणाऱ्या या गॅंगला शाहरुख खाननं चांगलीच धोबीपछाड दिल्याचं प्रत्यक्ष सिनेमा प्रदर्शित झाल्यावर दिसून आलं आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले असून, पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा मोठा गल्ला गोळा करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पठाणनं आतापर्यंत जगभरातून 550 कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी पठाणनं देशभरातून 80 कोटींची कमाई केली होती. सध्या देशात सुरु असणाऱ्या पठाण फिव्हरनं ट्रोलर्सची झोप उडवली असून, कमाईच्या आकड्यानं त्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. सिनेमात अभिनेता शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आशुतोष राणा, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.