ZIM vs AFG Test : वय फक्त एक आकडा! ४१ व्या वर्षी ठोकले वादळी द्विशतक; ब्रेंडन टेलर अन् क्रेग एर्विनचा नवा विश्वविक्रम
ZIM vs AFG Test : कसोटी क्रिकेटच्या दीडशे वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात एकाच सामन्यात ४० पेक्षा अधिक वय असलेल्या दोन फलंदाजांनी शतके झळकावण्याची ही केवळ तिसरीच वेळ ठरली.

ZIM vs AFG Test Brendan Taylor Craig Ervine Historic Centuries : अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला असला, तरी या सामन्याने क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी केलेल्या अभेद्य फलंदाजीमुळे सामन्यात तब्बल चार वेळा डावात ५०० धावांचा टप्पा ओलांडला गेला. मात्र, या सामन्याचे खरे आकर्षण ठरले ते झिम्बाब्वेचे दोन अनुभवी योद्धे ब्रेंडन टेलर आणि क्रेग एर्विन. पहिल्या डावात ४० वर्षीय टेलरने १३१ धावांची शतकी खेळी केली, तर दुसऱ्या डावात ४१ वर्षीय कर्णधार एर्विनने नाबाद द्विशतक ठोकत क्रिकेट विश्वाला थक्क केले.
१५० वर्षांच्या कसोटी इतिहासात केवळ तिसऱ्यांदाच घडला असा प्रसंग
कसोटी क्रिकेटच्या दीडशे वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात एकाच सामन्यात ४० पेक्षा अधिक वय असलेल्या दोन फलंदाजांनी शतके झळकावण्याची ही केवळ तिसरीच वेळ ठरली. पहिल्या दिवशी टेलरने शतक पूर्ण केले तेव्हा त्याचे वय ४० वर्षे २७२ दिवस होते. तर पाचव्या दिवशी एर्विनने शतक ठोकले तेव्हा त्याचे वय ४१ वर्षे ८२ दिवस इतके होते. दुसऱ्या डावात टेलरचे शतक अवघ्या १८ धावांनी हुकले; अन्यथा एकाच सामन्यात दोन्ही डावांत ४० पार फलंदाजांच्या शतकांचा अनोखा विक्रम पाहायला मिळाला असता.
४१ व्या वर्षी द्विशतक; एर्विनने नोंदवला ऐतिहासिक जागतिक विक्रम
2️⃣0️⃣0️⃣
Ervine gets his double century.
What a knock 👏 👏 👏.
#Undisputed #Chevrons #Zimbabwe #Afghanistan #AFGVZIM #Cricket https://t.co/xqMS9X1vmg
— Undisputed🎙️📺 (@Mr_Tich) November 9, 2026
दुसऱ्या डावात अविस्मरणीय द्विशतक झळकावून क्रेग एर्विनने अनेक विक्रमांना गवसणी घातली. तो कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील तिसरा सर्वात वयस्कर फलंदाज बनला आहे. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचे एरिक रोवन (४२ वर्षे ६ दिवस) अव्वल, तर इंग्लंडचे जॅक हॉब्स (४१ वर्षे १९५ दिवस) दुसऱ्या स्थानी आहेत. याशिवाय, झिम्बाब्वेकडून कसोटीत शतक आणि द्विशतक झळकावणारा तो आतापर्यंतचा सर्वात वयस्कर फलंदाजही ठरला आहे.
५०० धावांचे दोन महाकाय डोंगर; सामना अखेर अनिर्णित –
1st INNINGS – 40-year-old Brendan Taylor scores a hundred! 👏
2nd INNINGS – 41-year-old Craig Ervine scores a hundred! 🥹❤️
ZIMBABWE LEGENDS! They are standing tall and fighting for their country! 🇿🇼❤️
#ZimbabweCricket #TestCricket https://t.co/bgROaKdDlG— Sushanth (@CskStorm81274) November 9, 2026
झिम्बाब्वेने पहिल्या डावात टेलरच्या १३१ आणि ब्रायन बेनेटच्या १२८ धावांमुळे ५०० धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने सेदिकुल्लाह अटल, रहमानुल्लाह गुरबाज आणि रहमत शाह यांच्या तीन शतकांच्या जोरावर ५१४ धावा उभारल्या. दुसऱ्या डावात झिम्बाब्वेने एर्विनच्या द्विशतकाच्या जोरावर पुन्हा एकदा ५०० हून अधिक धावांचा डोंगर रचला. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर नांगर टाकल्याने हा ऐतिहासिक सामना अखेर अनिर्णित सुटला.





