जांबुत – पिंपरखेड (ता.शिरुर) येथील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांचे उत्तम नियोजन यामुळे एकत्रितपणे केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मितीमुळे पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सर्वांगीण विकास झाला आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी म्हंटले. पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवानिवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे आणि सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त दयानंद ढोमे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून दिलेल्या दोन इंटरअॅसक्टिव्ह बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. या बोर्डमुळे शाळेतील अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया अधिक आधुनिक व प्रभावी होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी अमेरिका येथील ‘नासा’ येथे भेट देऊन शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या इयत्ता सातवीचे विद्यार्थी स्वरूप बऱ्हाटे, विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल स्वराज पाडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रवीण गायकवाड, सुनिता दाते, मेघा रणसिंग, सुलोचना नाणेकर या शिक्षकांना सदिच्छा तर अरूण गांजे, लहू गाजरे, मधुमती गाजरे या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. “आपण आपल्या आई-वडील शिक्षकांमुळेच घडतो, या स्पर्धेच्या युगात नुसते पास होऊन उपयोग नाही आपल्या कडे गुणवत्ता असणे गरजेचे आहे. त्यासाठी संगत गुण चांगले ठेवा आणि शिकून मोठे व्हा,” असे मोलाचे मार्गदर्शन सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त दयानंद ढोमे यांनी विद्यार्थांना दिले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद बोंबे, केंद्रप्रमुख गणेश काळे, श्रीदत्त विद्यालयाचे प्राचार्य आर.के.मगर, मुख्याध्यापक पी.सी. बारहाते , उपसरपंच विकास वरे, भाऊसाहेब ढोमे, विजय बोंबे यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.सी.बारहाते, सुत्रसंचलन पोपट भालेराव तर आभार लता चव्हाण यांनी मानले.