satara | लिंबच्या प्राथमिक शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत

लिंब, (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 नवागतांचा प्रवेशोत्सव स्वागत सोहळा उत्साहात झाला. नवागतांच्या स्वागतासाठी प्रशालेमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. मुलांच्या मनातून शाळेची भीती दूर होण्यासाठी प्रशालेमध्ये आनंदमय वातावरण तयार करण्यात आले होते.
यावेळी शाळेमध्ये जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी भेट दिली. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, शाळा प्रवेशोत्सव, आदर्श शाळा, वर्ग पाहणे आणि संगणकांची अत्याधुनिक लॅब याची पाहणी त्यांनी केली.
या विशेष भेटीप्रसंगी शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, कार्यकारी अभियंता मोदी ,गटविकास अधिकारी सतीश बुध्ये, शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ.जयश्री गुरव, केंद्र प्रमुख सुरेश बोरकुटे, मुख्याध्यापक शिंदे, स्कूल कमिटी अध्यक्ष रामदास सोनमळे व सर्व शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ढोल, ताशांच्या गजरात फटाक्याची आतषबाजी करत मुलांची संपूर्ण गावातून स्वागत रॅली काढण्यात आली. इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गुलाब पुष्प देऊन आणि त्यांचे औक्षण करून नविन्यपूर्ण स्वागत करण्यात आले. नवगाथांचे अतिशय उत्साहाने स्वागत करून अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले.





