नियोजन शून्य कारभारामुळे पुणेकरांवर पाणीसंकट

नगरसेवकांनी फोडले महापालिका प्रशासनावर खापर


महापालिकेच्या मुख्यसभेत पडसाद

पुणे – निवडणूक काळात मुबलक सोडलेल्या पाण्यावर चकार शब्दही न काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी पाणीटंचाईचे खापर आता महापालिका अधिकाऱ्यांवर फोडण्याला सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांच्याच नियोजन शून्य कारभारामुळे पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्यसभेत केला. काम जमत नसेल तर खुर्च्या रिकाम्या करा, अशा शब्दांत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना दमात घेण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यापूर्वी दर गुरुवारी महापालिका प्रशासनाकडून देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणी बचतीचे तंत्र अवलंबण्यात येत होते. मात्र, निवडणुकीमध्ये नागरिकांचा रोष नको, यासाठी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार न करता सत्ताधाऱ्यांनी महिनाभर पाणीकपात न करण्याच्या तोंडी सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे महिनाभर खंड न पडता भरपूर पाणी सोडण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागासाठीही कालवा भरून पाणी सोडण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या या कृतीला सर्वविरोधकांनीही गप्प बसून एकप्रकारची सहमतीच दिल्याचे पहायला मिळाले.

निवडणुका संपताच पाणी कपातीचे अस्त्र उपसले आहे. मुबलक पाणी सोडण्याला प्रशासनाला भाग पाडणारेच आता पाणी प्रश्‍नावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहेत. महापालिकेच्या मुख्यसभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाने धायरी येथील पाणीचंटाईकडे सभागृहाचे लक्ष वेधले. शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, छुप्या पद्धतीने पाणी कपात सुरू असल्याचा आरोप केला. महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या धायरी गावातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून पाणी मिळत नाही. धायरी परिसरातील नागरिकांना दिवसरात्र पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आपापल्या भागातील पाणीटंचाईला महापालिका अधिकाऱ्यांचे चुकीचे नियोजन कसे कारणीभूत आहे, याचा पाढाच वाचला.

टॅंकरसाठी मुख्यवाहिनीवर टॅप
धायरी गावाला कालव्यातून पाणी उचलून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, कालवा बंद झाल्यानंतर पाणी उचलणे बंद झाले आहे. त्यामुळे या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याठिकाणी समान पाणीपुरवठा योजनेचे कामही सुरू आहे. परंतु, हे काम होण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. येथील नागरिकांच्या पाणी पुरवठ्यासाठी मुख्यवाहिनीवर टॅप मारून टॅंकर भरणा केंद्र सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे आश्‍वासन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी यावेळी दिले.

टक्‍केवारी मागणाऱ्यांची नावे जाहीर करा
धायरीकरांना पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. तसेच समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी काही माननियांकडून टक्‍केवारी मागितली जाते. त्यामुळे योजनेचा खर्च वाढल्याचे अधिकारी सांगत आहेत. अशा प्रकारे महापालिकेची कामे करण्यासाठी टक्‍केवारी मागणाऱ्यांची नावे जाहीर करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी मुख्यसभेत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.