नागालँडच्या सहा जिल्ह्यांमध्ये शून्य टक्के मतदान; चार लाख मतदारांपैकी एकानेही नाही केले मतदान

कोहिमा – नागालँडच्या पूर्व भागातील सहा जिल्ह्यांमध्ये निवडणूक कर्मचारी मतदारांची वाट पाहत राहीले, मात्र चार लाख मतदारांपैकी एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही.
फ्रंटियर नागालँड क्षेत्राच्या मागणीकरता दबाव बनवण्यासाठी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक यंत्रणा प्रतिक्षा करत राहीली आणि मतदार फिरकलेच नाहीत.
यासंदर्भात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो म्हणाले की राज्य सरकारला ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनच्या अर्थात ईनपीओच्या फ्रंटियर नागालँड क्षेत्राच्या मागणीबाबत काहीच अडचण नाही.
कारण राज्य सरकारने अगोदरच या भागाच्या स्वायत्त अधिकारांची शिफारस केली आहे. ईनपीओ ही पूर्व भागातील सात आदिवासी संघटनांची शिखर संघटना आहे.
दरम्यान आजच्या बंदबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की अधिकारी आणि आपत्कालीन सेवा वगळता आज नागालँडमध्ये शूकशूकाट होता. रस्त्यांवर माणसे आणि वाहनेही नव्हती.
नागालँडचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आवा लोरिंग म्हणाले की ७३८ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत निवडणूक कर्मचार उपस्थित होते.
२० विधानसभा क्षेत्रातील हे केंद्र आहेत. मात्र या ९ तासांमध्ये एकही मतदार मतदानासाठी आला नाही. केवळ एवढेच नाही तर या भागातील २० आमदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला नाही.
नागालँडच्या एकूण १३.२५ लाख मतदारांपैकी पूर्व भागातील सहा जिल्ह्यांतील मतदारांची संख्या ४ लाख ६३२ आहे. या चार लाख लोकांपैकी एकानेही मतदानाचा हक्क बजावला नाही.





