Zero Challan : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शून्य परीक्षा शुल्क
Zero Challan :

राज्यात २,४०३६५, तर पुणे विद्यापीठातील ६५,२०० विद्यार्थ्यांचे शुल्क माफ
Zero Challan : राज्यभरातील दुष्काळग्रस्त भागातील एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण पैशांअभावी थांबू नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तब्बल ६५,२०० विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना झिरो चलन (शून्य शुल्क) सुविधेचा लाभ घेतला आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण २,४०,३६५ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या २६५ वरून ३०५ वर पोहोचली आहे. या सर्व तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून पूर्ण सूट देण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. केवळ निर्णय न काढता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी संचालनालय, विद्यापीठ आणि परीक्षा संचालक अशा तीनही स्तरांवर विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील इतर प्रमुख विद्यापीठांनीही याबाबतची परिपत्रके जारी केली आहेत. परीक्षा अर्ज भरतानाच झिरो चलनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताना एकही रुपया भरावा लागलेला नाही.
ज्या विद्यार्थ्यांकडून आधीच परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते, त्यांच्या खात्यात ते पैसे परत करण्याची प्रक्रिया देखील विद्यापीठ स्तरावर वेगाने सुरू आहे. मुंबई विद्यापीठाने ४६,६७५ विद्यार्थ्यांचे सुमारे २.५ कोटी रुपये परीक्षा शुल्क परताव्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत असल्याने राज्यभरातील लाभार्थी विद्यार्थ्यांचा एकूण आकडा ५ लाखांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुष्काळाच्या या कठीण प्रसंगात कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हीच शासनाची ठाम भूमिका आहे. दुष्काळग्रस्त कुटुंबांतील विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा आर्थिक भार पडू नये, म्हणून विभागाने तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. ही शुल्कमाफीची प्रक्रिया अजूनही सुरू असून, राज्यातील एकही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाही.
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री





