Zenith Waterfall: खोपोलीत थरार! अचानक वाढलं पाणी अन् ७० पर्यटक अडकले; पाहा कस करण्यात आली सुटका
Zenith Waterfall: खोपोलीत मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ; काही काळ परिसरात निर्माण झाले भीतीचे वातावरण.

Zenith Waterfall – खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खोपोलीतील प्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सुमारे ७० पर्यटक अडकून पडले. या घटनेमुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलीस, अग्निशमन दल आणि स्वयंसेवकांच्या तत्पर बचावकार्यामुळे सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस स्टेशन, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. तरीही सर्व अडचणींवर मात करत बचाव पथकाने पर्यटकांना एकामागून एक सुरक्षित स्थळी हलविले. पावसाळा सुरू होताच राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक झेनिथ धबधब्याला भेट देतात.
मात्र, मुसळधार पावसामुळे नदी व ओढ्यांतील पाण्याची पातळी क्षणात वाढत असल्याने अशा ठिकाणी मोठा धोका निर्माण होतो. मंगळवारी २८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास अचानक पाणी वाढल्याने पर्यटक अडकले होते. दरम्यान, “पाण्याची पातळी कमी होत नाही तोपर्यंत कोणताही धोका पत्करू नका,” असे आवाहन बचाव पथकाने पर्यटकांना केले आहे. पावसाळ्यात धबधबे आणि नदीकाठच्या पर्यटनस्थळांवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनानेही केले आहे.




