‘युक्रेनमध्ये या आणि खरं वास्तव अनुभवा…’, झेलेन्स्की यांचे ट्रम्प यांना आवाहन, म्हणाले…

Russia Ukraine War | युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट जाहीर आवाहन करत, रशियाच्या आक्रमणामुळे झालेला विध्वंस पाहण्यासाठी यावे, असे आवाहन केले आहे. युक्रेनमध्ये उद्धवस्त झालेले प्रदेश पाहण्यासाठी युक्रेनमध्ये येण्याचे आवाहन केले आहे.
“रशियाने आमच्याशी काय केले आहे आणि सध्या काय करत आहेत, हे पाहण्यासाठी यावे. चर्चा किंवा निर्णय घेण्यापूर्वी इथे येऊन आमचे लोक, सैनिक, रुग्णालये, चर्च आणि उद्ध्वस्त झालेले शहर पाहावेत,” असे झेलेन्स्की यांनी एका मुलाखतीत आवाहन केले.
झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेली बैठक वादग्रस्त ठरली होती. त्या बैठकीनंतर त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. या वादग्रस्त बैठकीनंतर झेलेन्स्की कोणताही करार न करता व्हाईट हाऊसमधून निघून गेले होते.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले की, ट्रम्प जर युक्रेनमध्ये आले, तर त्यांच्या सन्मानासाठी कोणताही दिखावा किंवा ‘थिएटर’ उभा केला जाणार नाही. “ते रशियन आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोणत्याही भागाला भेट देऊ शकतात. आम्ही प्रचार करत नाही, हे आमचे वास्तव आहे,” असे ते म्हणाले.
“मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अनेकदा सांगितले आहे, पुतिन यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. ते युद्ध संपवू इच्छित नाही. त्यांचा हेतूच आमचा नाश करण्याचा आहे, आमचे सार्वभौमत्व आणि आमचे अस्तित्व नष्ट करण्याचा आहे,” असा आरोप झेलेन्स्की यांनी केला.
अमेरिकेच्या मध्यस्थीने सुचवण्यात आलेल्या युद्धविराम प्रस्तावाला युक्रेनने संमती दिली होती. मात्र, पुतिन यांनी त्याला नकार दिल्यामुळे हा शांतीचा प्रयत्न अपयशी ठरला. दोन्ही देशांमधील युद्ध सध्या निर्णायक वळणावर आहे.





