Zelensky meets Trump : युरोपातल्या नेत्यांबरोबर झेलेन्स्की यांनी घेतली ट्रम्प यांची भेट
Zelensky meets Trump – रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या उपयायोजनांवर चर्चा करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनी युरोपातल्या नेत्यांबरोबर मिळून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज भेट घेतली. त्यांच्यातल्या या चर्चेच्यावेळी ट्रम्प यांनी पुतीन यांच्याबरोबर अलास्का येथे झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. पण झेलेन्स्की आणि युरोपातल्या नेत्यांनी काय प्रत्युत्तर दिले आणि आजच्या चर्चेतून काय निष्कर्ष निघाला हे समजू शकलेले नाही. पण रशियाविरोधात युक्रेनच्या पाठिशी युरोपातले देश एकतेच्या भावनेने उभे असल्याचे चित्र यानिमित्ताने ट्रम्प यांच्या समोर उभे करण्यात आले.
अलास्का येथे शुक्रवारी ट्रम्प आणि पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेच्यावेळी झेलेन्स्की यांच्यासह युरोपातल्या नेत्यांना वगळण्यात आले होते. ते रशियाच्या कोणत्याही वाढत्या आक्रमकतेपासून युक्रेन आणि खंडाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात वादावादी झाली होती. तशी वेळ येऊ नये, म्हणून युरोपातल्या नेत्यांची अख्खी टीम झेलेन्स्की यांच्याबरोबर हजर होती.
क्रेनचे युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महत्वाच्या असलेल्या या भेटीवर अमेरिकेची प्रतिष्ठाही अवलंबून आहे. ब्रिटन आणि युरोपीय संघाने अमेरिकेच्या वाढीव आयात शुल्काला मान्यता दिल्यामुळे आता ही बैठक अमेरिकेसाठी देखील महत्वाची ठरली आहे. युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटन आणि युरोपीय संघाने हे वाढीव आयात ल्क मान्य केले आहे.
अलास्का येथील चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी जवळजवळ पुतीन यांची भूमि मान्य करून टाकली होती. युक्रेनचे भूभाग रशियाला देऊन टाकण्याला युरोपातील सर्वच नेत्यांकडून कडाडून विरोध केला जातो आहे. आंतरराष्ट्रीय सीमा एकतर्फीपणे बदलल्या जाऊ सकत नाहीत, या भूमिकेचा पुनरुच्चार युरोपातल्या नेत्यांकडून ट्रम्प यांच्याकडे केला जातो आहे. अमेरिकेने युरोपबरोबर मिळून काम करणे महत्वाचे आहे. युक्रेनला आणि पर्यायाने सर्व युरोपसाठी सुरक्षेची हमी मिळण्यासाठी हे आवश्यक आहे, असे झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मात्र पुतीन यांच्या मागण्या झेलेन्स्की यांनी मान्य कराव्यात, तरच हे युद्ध थांबवले जाऊ शकेल, असे ट्रम्प म्हणत आहेत. प्रादेशिक शांतता स्थायी स्वरुपाची असायला हवी. त्यासाठी डोनबास आणि क्रिमिया परत मिळवण्याचा आग्रह युक्रेनने सोडावा आणि नाटोचे सदस्यत्व मिळवण्याचा हद्दही सोडावा, या पुतीन यांच्या मागण्या झेलेन्स्की यांना मान्य करायला लावण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. पण युक्रेनची बाजू ट्रम्प यांनी पुतीन यांच्या समोर कशी मांडली, याविषयीची चर्चा युरोपातल्या नेत्यांबरोबरच्या बैठकीत होणे अपेक्षित होते.
वॉशिंग्टनमध्ये पोहोचल्यानंतर झेलेन्स्की यांनी आपण सर्वांना हे युद्ध लवकर आणि विश्वासार्हतेने संपवायचे आहे. आणि ही शांतता कायमस्वरूपी असली पाहिजे, असे एका अन्य पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांच्याबरोबरच्या चर्चेसाठी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर, जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब आणि नाटोचे सरचिटणीस मार्क रुट देखील वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत.
पुतीन यांच्या बरोबरच्या चर्चेत प्रगती आहे, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले होते. मात्र त्याचा तपशील त्यांनी उघड केला नव्हता. शांतता चर्चा पुढे नेण्यासाठी युद्धबंदी आवश्यक नाही, असे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. पण त्यांचा कल अचानक पुतीन यांनी पसंत केलेल्या भूमिकेकडे वळले असल्यामुळे युरोपातल्या नेत्यांमध्ये चिंता निर्माण झाली.
युक्रेनने क्रिमिया परत मिळवण्याचा आग्रह सोडावा…
चर्चेच्या आदल्या दिवशी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. झेलेन्स्की यांनी सवलतींना मान्यता द्यावी. युक्रेनला क्रिमिया परत मिळू शकणार नाही, हे मान्य करावे, हा आग्रह ट्रम्प यांनी धरला होता. रशियाने २०१४ साली क्रिमियावर ताबा मिळवला होता. तर ८ वर्षांपुर्वी पूर्व युक्रेनमधील डोनबास हा भाग देखील रशियाने अशाच प्रकारे मिळवला होता. तेंव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष झाला नव्हता.
मात्र २०२२ मध्ये हा संघर्ष सुरू झाला होता. क्रिमिया युक्रेनला परत मिळण्याचा आग्रह झेलेन्स्की यांनी धरला आहे. पण १२ वर्षांपुर्वी ओबामा यांच्या कारकिर्दीत एकही गोळी न झाडता ताब्यात घेतलेल्या क्रिमियाला आता परत दिले जाणे शक्य नाही. याशिवाय युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळू शकणार नाही, असे ट्रम्प झेलेन्स्की यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.





