मुंबई – माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गत आठवड्यात मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर त्यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी करत आपल्या वडिलांच्या हत्येशी संबंधित सर्व धागेदोरे तपासण्याची मागणी करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांची गत 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना अटकही केली आहे. त्यांची चौकशी सुरू असातना झिशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी दुपारी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासाशी संबंधित इत्यंभूत माहिती देण्यात आली. यावेळी उभय नेत्यांमध्ये या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत? यावरही उहापोह झाला. त्यानंतर झिशान यांनी प्रस्तुत प्रकरणात आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना न्याय हवा असल्याचे स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब म्हणजे झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी सायंकाळी एका ट्विटद्वारेही या प्रकरणाची न्यायाची मागणी केली होती. माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचे प्राण व घरांचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. आज माझे कुटुंब कोलमडून पडले. पण त्यांच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये. तसेच त्यांचे बलिदान व्यर्थही जाऊ नये. मला न्याय हवा असून, माझ्या कुटुंबालाही न्याय हवा आहे, असे ते म्हणाले होते.