Zeeshan Siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुलगा झिशान यांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले…

मुंबई : काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. झिशान यांनी आपल्या वडिलांच्या हत्येनंतर पाच दिवसांनंतर ट्विट करत न्यायाची मागणी केली आहे.
My father lost his life protecting and saving the lives and homes of poor innocent people. Today, my family is broken but his death must not be politicised and definitely not go in vain.
I NEED JUSTICE, MY FAMILY NEEDS JUSTICE!— Zeeshan Siddique (@zeeshanBabaS) October 17, 2024
काय म्हणाले झिशान सिद्दीकी?
“माझ्या वडिलांना लोकांचं संरक्षण करताना आणि निर्दोष गरीब लोकांची घरं वाचवताना जीव गमावला. आज माझे पूर्ण कुटुंब कोलमडलं आहे. पण माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण व्हायला नको. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको. मला न्याय हवाय, माझ्या कुटुंबाला न्याय हवाय”, असे ट्विट झिशान सिद्दीकी यांनी केले आहे.
‘त्या’ रात्री नेमके काय घडले होते?
बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी रात्री दहा वाजेच्या सुमारास तीन आरोपींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी कार्यालयातून बाहेर पडले असता अज्ञात तीन आरोपींनी रिक्षातून येऊन बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता.
या गोळीबारात बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं होतं. यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली होती.





