झाकीर नाईकबाबत बांगलादेश सरकार घेणार हा मोठा निर्णय ; भारताला धक्का बसणार ?

Zakir Naik Peace TV । कुख्यात अतिरेकी उपदेशक झाकीर नाईकचा पीस टीव्ही बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा प्रसारित होण्याची शक्यता आहे. खुद्द झाकीर नाईकने ही माहिती दिली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडून मंजुरी मिळताच पीस टीव्ही बांगलादेशमध्ये पुन्हा प्रसारण सुरू करणार असल्याचे झाकीर नाईकने म्हटले आहे. जुलै 2016 मध्ये, ढाका येथील होली आर्टिसन बेकरीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर, पीस टीव्ही बांगलादेशचे प्रसारण बंद करण्यात आले, कारण पकडलेल्या आरोपींपैकी एकाने सांगितले होते की, तो झाकीर नाईकच्या शिकवणीने प्रेरित आहे. या घटनेनंतर भारतातही तपास सुरू झाला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये पीस टीव्हीचे प्रक्षेपण बंद करण्यात आले.
झाकीर नाईक यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना याविषयीची माहिती दिली. सॅटेलाइटच्या माध्यमातून पीस टीव्ही बंगाली, उर्दू, इंग्रजी आणि चिनी भाषांमध्ये प्रसारित होत आहे. मात्र बांगलादेशमध्ये सरकारची परवानगी नसल्यामुळे प्रसारण बंद आहे. झाकीर म्हणाले की, बांगलादेशमध्ये पुन्हा प्रसारण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या ७ वर्षांपासून मलेशियामध्ये फरारी जीवन जगत असलेल्या झाकीर नाईकने सांगितले की, ‘अर्ज सादर करण्यात आला आहे, परवानगी मिळाल्यास बंगाली पीस टीव्ही काही दिवसात किंवा आठवड्यांत प्रसारण सुरू करेल.’
झाकीर नाईक हवा आहे Zakir Naik Peace TV ।
दरम्यान, झाकीर नाईक 2016 पासून भारतीय अधिकाऱ्यांकडून फरार आहे. बांगलादेशातील ढाका येथील बेकरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीरवर द्वेषपूर्ण भाषणे आणि मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दहशतवादी घटनेत 29 जणांचा मृत्यू झाला होता. भारतात तपास सुरू झाल्यानंतर झाकीर नाईक सौदी अरेबियामार्गे मलेशियाला पळून गेला.
मलेशिया आणि भारत यांच्यातील झाकीर नाईकचा मुद्दा Zakir Naik Peace TV ।
झाकीर नाईकचे प्रत्यार्पण हा आता भारत आणि मलेशियामधील वादग्रस्त मुद्दा बनला आहे. नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी सांगितले की, भारताने झाकीरविरोधात सबळ पुरावे दिल्यास झाकीरवर कारवाई करण्याचा विचार करू. यावेळी ते म्हणाले की, मलेशियामध्ये दहशतवादाला जागा नाही.





