Yuzvendra Chahal County : चतुर चहलची इंग्लंडमध्ये जादू! बेन स्टोक्सच्या दांड्या केल्या गुल; भन्नाट चेंडूचा VIDEO होतोय तुफान व्हायरल
Yuzvendra Chahal County : काउंटी चॅम्पियनशिपमध्ये युझवेंद्र चहलने बेन स्टोक्सचा त्रिफळा उडवल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Yuzvendra Chahal County Championship 4 Wickets Cleans Up Ben Stokes Bowled Video Viral : भारताचा स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) इंग्लंडच्या मैदानावर आपल्या फिरकीची जादू दाखवत जोरदार पुनरागमन केले आहे. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉर्थम्प्टनशायर संघाचे प्रतिनिधित्व करताना चहलने डरहमविरुद्ध भेदक मारा करत ४ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याच्या या भेदक स्पेलच्या जोरावर नॉर्थम्प्टनशायरने डरहमवर पहिल्या डावात २० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. चहलने ॲलेक्स लीस, बेन स्टोक्स, केसी एल्ड्रिज आणि मॅथ्यू पॉट्स या प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवले.
बेन स्टोक्सची उडवली दांडी; भन्नाट चेंडूचा व्हिडीओ व्हायरल –
या सामन्यात इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला ज्या पद्धतीने चहलने बाद केले, त्याची सध्या जगभरात चर्चा रंगली आहे. चहलने ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू कमालीचा टर्न घेत आत आला आणि स्टोक्सला काही समजण्याआधीच थेट लेग-स्टंप उडाला. या जादुई चेंडूवर स्टोक्स पूर्णपणे निरुत्तर झाला. सोशल मीडियावर या विकेटचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही या टर्नचे कौतुक करत आहेत.
That is sensational pic.twitter.com/ChwDk7JfLR
— Rothesay County Championship (@CountyChamp) September 3, 2026
इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर भारतीय खेळाडूंचा बोलबाला –
चहलव्यतिरिक्त कुलदीप यादव, आकिब नबी आणि राहुल चहर हे भारतीय गोलंदाजही सध्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवत आहेत. महत्त्वाच्या मालिकांपूर्वी इंग्लंडमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर लाल चेंडूने चहलने केलेली ही कामगिरी त्याचे कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्थान अधिक मजबूत करणारी ठरली आहे.
अर्शदीप सिंगच्या ‘टॉप-५’ भारतीय गोलंदाजांच्या यादीत चहलला स्थान –
दरम्यान, भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एका यूट्यूब चॅनेलवर आपल्या आवडत्या ५ भारतीय गोलंदाजांची नावे जाहीर केली. यामध्ये त्याने भुवनेश्वर कुमारला अव्वल, मोहम्मद शमीला दुसरे आणि कुलदीप यादवला तिसरे स्थान दिले. पंजाब संघातील आपला सहकारी युझवेंद्र चहलला त्याने चौथ्या क्रमांकावर निवडले, तर दिग्गज आर. अश्विनला पाचव्या स्थानी ठेवत अर्शदीपने मिश्कीलपणे अश्विनची माफीही मागितली.





