Sanju Samson Opening : अभिषेक शर्माचा पत्ता कट होणार? संजू-वैभवची नवी जोडी मैदानात उतरणार; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ!
Sanju Samson Opening : संजू सॅमसनच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाच्या सलामी जोडीबाबत क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Sanju Samson Vaibhav Sooryavanshi New Opening Pair Deep Dasgupta Suggestion IND vs AFG T20 : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे (Sanju Samson) पुनरागमन झाले आहे. सॅमसनच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाच्या सलामी जोडीबाबत क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारताचे माजी यष्टिरक्षक दीप दासगुप्ता यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसन आणि १५ वर्षीय युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) या जोडीला सलामीला मैदानात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला संघ व्यवस्थापनाला दिला आहे.
सॅमसन-सूर्यवंशी जोडी जमणार?; दीप दासगुप्तांनी मांडले नवे समीकरण!
आपले मत मांडताना दीप दासगुप्ता म्हणाले, “भारताने यापूर्वी अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनाही डावाची सुरुवात करताना पाहिले आहे. मात्र, सॅमसन आणि वैभव या दोघांनी भारतासाठी अद्याप एकदाही एकत्र सलामी दिलेली नाही. आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी विविध कॉम्बिनेशन तपासण्यासाठी या दोघांना एकत्र सलामीला उतरवणे हा एक अत्यंत स्फोटक आणि रंजक प्रयोग ठरू शकतो.”
१५ वर्षीय वैभवची जिम्बाब्वे दौऱ्यात तुफानी फटकेबाजी; ठरला ‘मालिकावीर’ –
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांना थक्क केले होते. त्याने ३ डावांत ५०.३३ ची सरासरी आणि १९६.१० च्या वादळी स्ट्राइक रेटने १५१ धावा चोपल्या. यामध्ये २ अर्धशतके आणि एका सामन्यातील ८१ धावांच्या खेळीचा समावेश होता. या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा किताब मिळाला. त्याच्या या फॉर्ममुळे तो सलामीसाठी प्रबळ दावेदार बनला आहे.
संजू सॅमसनसाठी सुवर्णसंधी; विश्वचषकापूर्वी संघ व्यवस्थापनाची मोठी परीक्षा –
झिम्बाब्वे दौऱ्यातून वगळण्यात आल्यानंतर आता संजू सॅमसनकडे संघात स्वतःचे स्थान अधिक भक्कम करण्याची ही मोठी संधी आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी हे तिघेही अव्वल फळीतील आक्रमक फलंदाज असल्याने कर्णधार श्रेयस अय्यर कोणाला सलामीला पाठवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर सॅमसन आणि वैभव एकत्र मैदानात उतरले, तर ही प्रतिस्पर्ध्यांसाठी कर्दनकाळ ठरणारी जोडी ठरू शकते.





