Abhishek Sharma Birthday : “पहिल्या चेंडूवर षटकार मारणार नाही…”; युवराजने अभिषेककडून काढून घेतल्या उठाबशा; पाहा VIDEO
Abhishek Sharma Birthday : युवराजने शेअर केलेल्या जुन्या व्हिडिओमध्ये तो मैदानावर अभिषेककडून उठाबशा काढून घेताना दिसत आहे, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Yuvraj Singh Birthday Wishes Abhishek Sharma Viral Sit Ups Video Guru Shishya Bond : भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक युवा सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) ४ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकला देशांतर्गत क्रिकेटपासून टीम इंडियाच्या स्टार खेळाडूपर्यंत घडवण्यात भारताचा माजी महान अष्टपैलू युवराज सिंगची (Yuvraj Singh) भूमिका सर्वात मोलाची ठरली आहे. या खास दिवशी अभिषेकचे गुरू असलेल्या युवराज सिंगने सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर आणि भावनिक व्हिडीओ शेअर करत आपल्या लाडक्या शिष्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मैदानावर उठाबशांची शिक्षा; “मी पहिल्या चेंडूवर षटकार मारणार नाही!”
युवराजने शेअर केलेल्या जुन्या व्हिडिओमध्ये तो मैदानावर अभिषेककडून उठाबशा काढून घेताना दिसत आहे. पहिल्याच चेंडूवर आक्रमक फटका मारून बाद होण्याची चूक टाळण्यासाठी युवी त्याला कठोर शिस्त लावताना दिसतो. “मी पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारणार नाही, मी मैदानावर वेळ घेऊन संयमाने फलंदाजी करेन,” असे वदवून घेत युवराजने अभिषेकला ही अजब पण महत्त्वाची शिक्षा दिली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला अभिषेक; गुरु-शिष्याची घट्ट मैत्री कायम –
View this post on Instagram
युवराज सिंगच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि तंत्रातील सुधारणांमुळे अभिषेक शर्मा आज जागतिक क्रिकेटमधील एक घातक सलामीवीर बनला आहे. भारतीय संघाकडून खेळताना त्याने ५६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १६०० हून अधिक धावा कुटल्या आहेत, तर आयपीएलमध्ये ९२ सामन्यांत २३७९ धावा त्याच्या खात्यात जमा आहेत. अफाट यश आणि प्रसिद्धी मिळवूनही या दोघांमधील गुरु-शिष्याचे नाते आणि मैत्रीचे अतूट बंध आजही तितकेच घट्ट आहेत.
“हे वर्ष शतकांनी भरलेले असावे!”; युवराजची भावूक पोस्ट
व्हिडिओसोबत युवराजने एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला, “सर अभिषेक, तुझा वाढदिवस खरोखरच शुभ दिवस आहे. एक व्यक्ती म्हणून तू ज्या प्रकारे घडलास, ते पाहून मला अभिमान वाटतो. तू इतरांची काळजी घेणारा आणि उत्तम नेतृत्वगुण असलेला खेळाडू आहेस. अपयशातून शिकून कठोर मेहनत घेण्याची तुझी तयारी कौतुकास्पद आहे. हे वर्ष तुझ्यासाठी भरपूर धावा आणि शतकांनी भरलेले जावो,” अशा शब्दांत युवीने आपल्या शिष्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला.





