Yuvraj Singh : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगोदर सिक्सर किंगची टीममध्ये एन्ट्री! 43 व्या वर्षी गाजवणार मैदान

टीम इंडियचा माजी ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) या महिन्याच्या 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याच्या चाहत्यांसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. 43 व्या वर्षी तो मैदानात पुन्हा फलंदाजी करताना दिसणार आहे. वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग (Yuvraj Singh) या लीगमध्ये इंडिया मास्टर्सचं प्रतिनिधित्व करणार आहे. येत्या 22 फेब्रुवारीपासून या लीगला सुरूवात होणार आहे.
युवराज सिंग हा माजी दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्स संघाचा भाग असणार आहे. या लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत. युवराज सिंगने इंडिया मास्टर्स संघासह मैदानात परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये खेळण्यापूर्वी, युवराज सिंग शेवटचा 2024 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये खेळताना दिसला होता. त्यावेळी त्याने टीम इंडियाला फायनल जिंकवली होती.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघ सामील होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराज सिंगने 2007 टी-ट्वेंटी वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
युवराज सिंगच्या नावावर आहेत ‘हे’ रेकॉर्ड
1. T20 विश्वचषकात एका षटकात 6 षटकार मारणारा एकमेव खेळाडू.
२ . विश्वचषकात 300 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 15 विकेट घेणारा तो पहिला अष्टपैलू खेळाडू आहे.
३ . त्याने 2007 ICC विश्व ट्वेंटी20 दरम्यान इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध 12 चेंडूत सर्वात वेगवान टी-20 अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला.
युवराज सिंगच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 14 शतके आणि 52 अर्धशतकांच्या मदतीने 36 च्या सरासरीने 8701 धावा केल्या. युवराज हा अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याने या फॉरमॅटमध्ये 111 विकेट्सही घेतल्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 150 होती. तसेच त्याने 40 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 62 डावात 34 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहेत ज्यात 3 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या १६९ धावा होती. त्याच फॉरमॅटमध्ये त्याने 9 विकेट्सही घेतल्या आहेत आणि 9 धावांत 2 विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती.
त्याच्या T20 करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याने 51 डावात 28 च्या सरासरीने 1177 धावा केल्या, ज्यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला या फॉरमॅटमध्ये शतक करता आलेले नाही. त्याने T20 फॉरमॅटमध्ये 28 विकेट्सही घेतल्या, ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल होता 17 धावांत 3 बळी.
आता तो पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग या लीगमध्ये इंडिया मास्टर्सचं प्रतिनिधित्व करणार आहे. येत्या 22 फेब्रुवारीपासून या लीगला सुरूवात होणार आहे. त्याचे चाहते त्याला पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.





