Baramati News : युगेंद्र पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांची विचारपूस
Baramati News : अपघातात चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य योगेश पाटील यांनी दिली. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली.

बारामती : पाटस येथून सुप्याकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटातील पहिल्या वळणावर उलटली. विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
अपघातात चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य योगेश पाटील यांनी दिली. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित प्रशासन तसेच रुग्णालयाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्याची माहिती राजकुमार लव्हे यांनी दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही घटनेची माहिती मिळताच प्रशासनाला आवश्यक सूचना केल्याचे सांगण्यात आले.
एसटीच्या देखभालीवर पालकांचे प्रश्नचिन्ह
अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एसटी बस डेपोतून बाहेर पडण्यापूर्वी ब्रेक, इंजिन, टायर, हॉर्न यांसह अन्य तांत्रिक बाबींची नियमित तपासणी केली जाते का, याची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बसचा दररोजचा सुरक्षा तपासणी अहवाल ठेवण्यात यावा, अशीही मागणी पालकांनी केली. सुपे घाटातील धोकादायक वळणावर कठडे, सुरक्षा उपाययोजना, संरक्षण व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे.
आज शाळेत गेलो नसल्याने अपघातातून वाचलो
दरम्यान, इयत्ता तिसरीतील साईराज सुनील चोरमले हा विद्यार्थी पायातील शूज घेण्यासाठी वडिलांसोबत गेला होता. त्यामुळे तो नेहमीच्या बसने शाळेत गेला नाही. ‘आज मी वडिलांसोबत गेलो असल्याने अपघातातून वाचलो,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.





