आंध्रात पुन्हा येणार वायएसआर सरकार; माजी मुख्यमंत्र्याचा दावा

हैदराबाद : पुढील तीन वर्षांत वायएसआरसीपी राज्यात पुन्हा सत्तेत येईल. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सध्या काहीच काम करताना दिसत नाही. या सरकारने निवडणूक आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, असे प्रतिपादन आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी केले आहे.
वायएसआरसीपीच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त ताडेपल्ली येथे बोलताना रेड्डी म्हणाले की, वायएसआरसीपी नेहमीच सर्वसामान्यांचा आवाज राहिला आहे. हा पक्ष आपल्या आश्वासनांचे पालन करत असल्याने लोक त्यांच्या पक्षाचे स्वागत करत असतो. मुख्यमंत्री नायडु यांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळाचे १० महिने पूर्ण केले आहेत परंतु त्यांनी त्यांच्या ‘सुपर सिक्स’ निवडणूक आश्वासनांकडे दुर्लक्ष केले आहे. या आश्वासनांमध्ये १९ ते ५९ वयोगटातील महिलांना मासिक १,५०० रुपये मदत, तरुणांना २० लाख नोकऱ्या किंवा ३,००० रुपये बेरोजगारी भत्ता आणि महिलांसाठी मोफत बस प्रवास यांचा समावेश होता.
जगन मोहन रेड्डी यांनी नायडू सरकारवर शिक्षण, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि प्रशासनात पूर्णपणे अपयश आल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, सरकारच्या दुर्लक्षामुळे मुलांनाही समस्या येत आहेत, विशेषतः विद्यार्थ्यांच्या शुल्क परतफेडीत समस्या आहे. दरवर्षी २,८०० कोटी रुपये आवश्यक असतात, परंतु आतापर्यंत फक्त ७०० कोटी रुपयेच वाटप करण्यात आले आहेत. हे सरकार गेल्या वर्षीची थकबाकी भरत आहे, तर या वर्षाचा भार पुढील वर्षावर टाकत आहे.





