सिख गुरूंवरील AI व्हिडिओमुळे यूट्यूबर ध्रुव राठी वादात, पंजाबपासून दिल्लीपर्यंत संताप

नवी दिल्ली: प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी त्याच्यावर सिख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. हरियाणातील ध्रुव राठी याने ‘द राइज ऑफ सिख’ नावाचा AI-निर्मित व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला, ज्यामुळे पंजाबमध्ये तीव्र विरोध होत आहे. सिख समुदायाने हा व्हिडिओ सिख गुरूंना अपमानित करणारा असल्याचे सांगत राठी याच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. दिल्लीतही दिल्ली सिख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (DSGPC) याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पंजाबमध्ये तीव्र संताप, व्हिडिओ हटवण्याची मागणी –
पंजाबमध्ये या व्हिडिओविरोधात मोठा रोष आहे. सिख समुदायाने हा व्हिडिओ तातडीने सोशल मीडियावरून हटवण्याची मागणी केली आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे याची तीव्र निंदा केली. ते म्हणाले, “ध्रुव राठी याच्या ‘द सिख वॉरियर हू टेररिफाइड द मुगल्स’ या व्हिडिओची मी तीव्र निंदा करतो. हा व्हिडिओ केवळ तथ्यात्मक चुकीचा नाही, तर सिख इतिहास आणि भावनांचा घोर अपमान करणारा आहे. श्री गुरु गोबिंद सिंह जी, जे शौर्य आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहेत, त्यांना लहान मुलाच्या रूपात रडताना दाखवणे हा सिख धर्माच्या निडरता, दृढनिश्चय या मूलभूत भावनांचा अपमान आहे.”
“पवित्र इतिहासाशी छेडछाड खपवून घेतली जाणार नाही”
सिरसा यांनी पुढे लिहिले, “DSGMC ने राठी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या सततच्या कृत्यांमुळे त्याच्या यूट्यूब खात्याची पुनरावलोकनाची मागणी केली आहे. दिल्ली पोलिसांनी धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याच्या हेतूने केलेल्या कृत्यांबाबत IPC कलम 295A अंतर्गत राठी याच्यावर FIR दाखल करावा. सिख समुदाय काँग्रेसच्या समर्थकाने आपल्या पवित्र इतिहासाशी छेडछाड करणे कदापि सहन करणार नाही.”
I condemn Dhruv Rathee’s recent video on “The Sikh Warrior Who Terrified the Mughals” that is not only factually flawed but blatantly disrespectful to Sikh history and sentiments. Showing Sri Guru Gobind Singh Ji, the embodiment of courage and divinity, crying as a child is an… https://t.co/Hf4aiB6pNC pic.twitter.com/e9p5Sd75N8
— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) May 19, 2025
DSGMC: “कृत्य सांस्कृतिकदृष्ट्या असंवेदनशील”
DSGMC चे अध्यक्ष हरमीत सिंह कालका यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, “DSGMC ध्रुव राठी याच्या ‘द सिख वॉरियर हू टेररिफाइड द मुगल्स’ या व्हिडिओची तीव्र निंदा करते. यात सिख गुरूंना चित्रित करण्यासाठी AI-निर्मित दृश्यांचा बेजबाबदारपणे वापर करण्यात आला आहे. हे कृत्य सांस्कृतिकदृष्ट्या असंवेदनशील तर आहेच, शिवाय सिख भावना आणि परंपरांचा घोर अपमान करणारे आहे.”
बाल गुरु गोबिंद सिंह यांना रडताना दाखवले –
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC) चे सदस्य गुरचरण सिंह ग्रेवाल यांनीही सिख इतिहास विकृत केल्याबद्दल राठी यांच्यावर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “राठी याना सिख इतिहास विकृत करण्यासाठी AI चा वापर करण्याचा कोणताही अधिकार नाही. सिख इतिहास आणि गुरूंना अत्यंत आदराने हाताळले पाहिजे आणि त्याचे व्यावसायीकरण टाळले पाहिजे.” या व्हिडिओत गुरु गोबिंद सिंह जींना बाल गोविंद राय म्हणून दाखवले आहे, जे आपले वडील गुरु तेग बहादुर यांच्या बलिदाना नंतर रडताना दिसतात. सिख समुदायाच्या मते, हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि असे चित्रण करून राठी याने सिख धर्माचा अपमान केला आहे.
ध्रुव राठीचे स्पष्टीकरण –
वाद वाढल्यानंतर ध्रुव राठी याने एक व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली. तो म्हणाला, “काही लोकांना हा व्हिडिओ आवडला, पण सिख समुदायातील काहींचे म्हणणे आहे की, एनिमेशनद्वारे सिख गुरूंना दाखवणे चुकीचे आहे. गुरु गोबिंद सिंह जींना असे चित्रित करणे योग्य नाही. सिख गुरूंची कहाणी फोटोंशिवाय सांगणे शक्य नाही. लोक सोशल मीडियावर आपली मते मांडू शकतात. त्यानंतर मी व्हिडिओ हटवण्याचा किंवा अन्य कारवाईचा निर्णय घेईन.” मूळचे हरियाणातील रोहतकचा असलेला ध्रुव राठी सध्या जर्मनीत राहतो.
व्हिडिओत काय आहे?
ध्रुव राठी याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर ‘द सिख वॉरियर हू टेरीफाइड द मुगल्स, लीजेंड ऑफ बंदा सिंह बहादुर’ नावाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. यात सिख गुरूंचे बलिदान, मुगलांचे अत्याचार आणि त्यांच्याशी झालेल्या युद्धांची माहिती देण्यात आली आहे. गुरु तेग बहादुर यांचे बलिदान, गुरु गोबिंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना, पंज प्यारे निवडणे आणि त्यांच्या मुलांच्या शहादतीचा समावेश आहे. व्हिडिओ तयार करण्यासाठी AI चा वापर करण्यात आला आहे, ज्याचा पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. सिख गुरूंची केवळ स्थिर छायाचित्रे वापरण्याची परंपरा आहे, तसेच बंदा सिंह बहादुर यांना रॉबिन हुड संबोधल्यानेही वाद निर्माण झाला आहे.





