Youtuber Dhruv Rathi: युट्यूबर ध्रुव राठीच्या विरोधात गुन्हा दाखल; ओम बिर्लांच्या मुलीविषयीची पोस्ट भोवली

Youtuber Dhruv Rathi | Om Birla | Anjali Birla – प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीच्या विरोधात महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजलीबाबात पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंजलीने यूपीएससी परीक्षेला न बसताच उत्तीर्ण झाल्याची माहिती ध्रुव राठीच्या एक्स अकाऊंटवरून देण्यात आली होती.
पोलिसांनी भारत न्याय संहिता कायद्याखाली अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. जाणुनबुजून एखाद्याची बदनामी करत सामाजिक शांततेला धक्का पोहोचवण्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार आगळीक करणारे विधान केल्याबद्दलही गुन्हा दाखल झाला आहे.
As directed by @MahaCyber1, I have deleted all my posts and comments on Anjali Birla, I will like to apologize as I was unaware about the facts and copied someone else’ tweets and shared it.
🙏🙏 pic.twitter.com/Lbr3c9oGZV— Dhruv Rathee (Parody) (@dhruvrahtee) July 13, 2024
ध्रुव राठी हा युट्यूबवर प्रसिद्ध आहे. राजकीय, विश्लेषणात्मक व्हिडीओ ध्रुवकडून तयार केले जातात. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याने भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात काही व्हिडीओ टाकले होते. त्या व्हिडीओ खूपच चर्चेत राहिले होते.
यामुळे भाजप समर्थकांकडून ध्रुव राठीला अनेकदा लक्ष्य करण्यात येत असते. ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी टाकलेली पोस्ट ही थेट ध्रुव राठीच्या वैयक्तिक अकाऊंटवरून गेलेली नाही. ध्रुव राठी पॅरोडी या नावाने असलेल्या अकाऊंटवरून सदर पोस्ट करण्यात आली होती.
कोण आहे ध्रुव राठी?
ध्रुव राठीने सुरुवातील ट्रॅव्हल व्लॉग सारखे व्हिडिओ तयार करून प्रसिद्धी मिळविली. त्यानंतर तो सामाजिक, राजकीय भाष्य करणारे व्हिडिओ करू लागला. १९९४ साली जन्मलेला ध्रुव राठी अवघ्या २९ वर्षांचा आहे.
ध्रुव राठीचे कुटुंब मुळचे हरियाणामधील रोहतकचे असून ते सध्या जर्मनीत वास्तव्यास आहेत. ध्रुव राठीचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी ध्रुव जर्मनीत गेला.





