भाजप सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही याची युवकांना जाणिव ! महिला नेत्याचा 2 रिपोर्टवरून केंद्र सरकारवर निशाणा

नवी दिल्ली – इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट या दोन संस्थांच्या अहवालावरून भारतातील बेरोजगारीची समस्या गंभीर झाल्याचे दिसून आले आहे. आणि आता भाजपचे सरकार या देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाही याची देशातील युवकांनाही जाणिव झाली आहे असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी म्हटले आहे.
इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 चा हवाला देऊन, प्रियंका यांनी निदर्शनास आणले की भारतातील एकूण बेरोजगार लोकांपैकी ८३ टक्के तरुण आहेत. एकूण बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचा हिस्सा सन २००० मध्ये ३५.२ टक्के इतका पण सन २०२२ मध्ये, तो जवळजवळ दुप्पट होऊन ६५.७ टक्के इतका झाला आहे दुसरीकडे, पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार सरकार बेरोजगारीची समस्या सोडवू शकत नाही असे म्हणत आहेतयाकडेही प्रियंकांनी युवकांचे लक्ष वेधले आहे. आणि हेच भाजप सरकारचे सत्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
आज देशातील प्रत्येक तरुणाला समजले आहे की भाजप रोजगार देऊ शकत नाही. पण युवकांना रोजगार देण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे ठोस योजना आहे, असे त्या म्हणाल्या. कॉंग्रेसने ३० लाख सरकारी पदे भरली जातील अशी हमी दिली आहे. त्याखेरीज रोजगारासाठीच्या अन्य हमीही क्रॉंगेसने जाहीर केल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
प्रत्येक पदवीधर/डिप्लोमा धारकाला वर्षाला १ लाख रुपयांची शिकाऊ शिष्यवृत्ती कॉंग्रेस सरकारकडून दिली जाईल,असे प्रियंकांनी म्हटले आहे. पेपरफुटीच्या विरोधात काँग्रेस नवीन कडक कायदा आणणार आहे, असे त्यांनी नमूद केले.





