बीडमध्ये भीषण अपघात, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांना एसटी बसने चिरडले

Accident in Beed : बीडमध्ये मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसने तरूणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यायामासाठी गेलेल्या 5 तरूणांना एसटीने बसने चिरडले. या घटनेमध्ये 3 तरूणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले आहेत.
बीड-परळी रस्त्यावर असलेल्या घोडका राजुरी फाट्याजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये मृत पावलेल्या तरूणांची नावे ओम सुग्रीव घोडके (वय 19 वर्षे), विराट बब्रुवान घोडके (वय 18 वर्ष) आणि सुबोध बाबासाहेब मोरे (वय 19 वर्ष) अशी आहेत. तर आदित्य लक्ष्मण घोडके आणि निखिल बळीराम डरपे हे दोन तरूण या अपघातात जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे तरूण पोलीस भरतीची तयारी करत होते. यासाठी ते पहाटे व्यायामासाठी गेले होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने या तरूणांना चिरडले. हे सर्व तरूण घोडका राजुरी गावचे रहिवासी आहेत. पोलीस होण्याचे स्वप्न मनाशी बाळगलेल्या या तरूणांचा अपघातात मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघाताबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपास पोलीस करत आहेत.





