Ravet News | तरुणांची हुल्लडबाजी, शिवीगाळ आणि टोळक्यांचे वादविवाद ; नागरिक हैराण..

प्रभात वृत्तसेवा
रावेत – एकीकडे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर हे ‘शिक्षणाची नगरी’ म्हणून ओळखली जाते. एकीकडे हे चित्र असताना मात्र दुसरीकडे निगडी प्राधिकरणातील जय हिंद चौक येथे उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन तरुणांची हुल्लडबाजी, शिवीगाळ आणि रस्त्यावरचे टोळक्यांचे वादविवाद हे नित्याचे झाले आहे. या प्रकारांमुळे परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत आहे.जय हिंद चौक परिसरातील महाविद्यालयीन वातावरणात सकाळी व दुपारी तरुणांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तेथे टोळक्याने जमून आरडाओरड, बिनधास्त अश्लील भाषा, बुलेटच्या बदललेल्या सायलेन्सरमुळे होणारा आवाज आणि रस्त्यावर वेगात वाहने चालवणे या प्रकारांनी नागरिकांचा संताप वाढत आहे.
पोलीस असेपर्यंतच परिसर शांत..
नागरिकांनी या प्रकारांविरोधात पोलिसांना निवेदन दिले आहे. परंतु पोलिसांची गस्त फक्त काही काळापुरतीच असते. पोलीस गस्त करत असतानाच या तरुणांचे टोळके पांगतात, आणि पोलीस निघताच पुन्हा एकत्र येऊन भांडण, गोंधळ सुरू होतो.कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करावनागरिकांनी यावर उपाय सुचवत सांगितले की, काही दिवस तरी या चौकात कायमस्वरूपी एक पोलीस कर्मचारी नियुक्त केल्यास या हुल्लडबाजांना आळा बसेल. जय हिंद चौक हे शिक्षणाच्या केंद्रस्थानी असले तरी अशा वर्तनामुळे सुसंस्कृत शहर म्हणून असलेली ओळख धूसर होत चालली आहे. आता पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, चौकात शांतता राखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.





