वडगाव हवेली येथे अपघातात युवक ठार, एक जण गंभीर

वडगाव हवेली – कराड-तासगाव मार्गावर सोमवारी (दि. 3) रात्री 9 च्या सुमारास वडगाव हवेली, ता. कराड येथील महात्मा गांधी विद्यालयासमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची पाठीमागून जोराची धडक बसून रोहिदास उर्फ किरण माणिक गोडसे (वय 31, रा. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली) हे ठार झाले, तर सदानंद आप्पासाहेब शिंगाडे (वय 25, रा. शेणोली स्टेशन, ता. कराड) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड-तासगाव मार्गावरून निघालेल्या ट्रॅक्टरमधील डीझेल संपल्याने चालकाने ट्रॅक्टर वडगाव हवेली येथील महात्मा गांधी विद्यालयासमोर सोमवारी (दि. 3) रात्री रस्त्यावर उभा केला होता. कराडकडून आलेल्या दुचाकीची रात्री 9 च्या सुमारास ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेले रोहिदास गोडसे व सदानंद शिंगाडे हे रस्त्यावर पडले होते.
अपघाताची माहिती मिळताच वडगाव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रोहिदास गोडसे यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सदानंद शिंगाडे यांना ग्रामस्थांनी तातडीने कराडला रुग्णालयात हलविले. या अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, कराड-तासगाव मार्गावर नेहमीच मोठी रहदारी असते. या मार्गावर वडगाव येथे रस्त्यालगत महात्मा गांधी विद्यालय आहे. गावात येण्या-जाण्याचा हा मार्ग असल्याने तेथे नेहमीच विद्यार्थी व ग्रामस्थांचा वावर असतो. याठिकाणी अनेक किरकोळ व गंभीर अपघात झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी गतिरोधक व रम्बलर स्ट्रिप बसवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. आता तरी तेथे गतिरोधक व रम्बलर स्ट्रिप करावी, अशी मागणी होत आहे.





