मनीष शर्मा युवा काँग्रेसचे नवे प्रभारी! कृष्णा अल्लावरूंची जागा घेतली

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाने गुरुवारी भारतीय युवा काँग्रेसच्या प्रभारीपदी मोठा फेरबदल करत कृष्णा अल्लावरू यांच्या जागी मनीष शर्मा यांची नियुक्ती केली आहे. अल्लावरू हे सध्या पक्षाचे बिहार प्रभारी म्हणून कार्यरत असून, गेल्या अनेक महिन्यांपासून ते ही दुहेरी जबाबदारी सांभाळत होते.
काँग्रेस पक्षाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मनीष शर्मा यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला त्वरित मंजुरी दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना, काँग्रेसने हा महत्त्वाचा बदल केला आहे.
मनीष शर्मा यांच्याकडे काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी ‘व्हाईट टी-शर्ट मूव्हमेंट’ची जबाबदारी आहे. सामाजिक न्याय आणि संवैधानिक मूल्यांसाठी कटिबद्ध असलेल्या युवा आणि कार्यकर्त्यांना संघटित करणे तसेच त्यांना नेतृत्वासाठी तयार करणे, हे या राष्ट्रीय काँग्रेसने विकसित केलेल्या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे.





