Walmik Karad : वाल्मीक कराडच्या बातम्या पाहिल्याने तरुणास मारहाण

बीड : वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बातम्या मोबाईलवर का पाहतोस असं म्हणत दोघांनी एका तरुणाला लोखंडी रॉड, कोयत्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना बीडमधील धारूर गावात घडली आहे.
एवढंच नाही तर यापुढे वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडीओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकीही त्यांनी दिली. अशोक शंकर मोहिते असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जखमीचा मावस भाऊ बाळासाहेब भोसले यांनी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून पोलिसांनी वैजनाथ भारत बांगर व अभिषेक सिद्धेश्वर सानप या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
अशोक मोहिते हे तरनळी येथील रमाई चौक येथे बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोबाईलवर वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील बातम्या पाहत होते. ही बाब मोटरसायकलवरून आलेल्या वैजनाथ बांगर, अभिषेक सानप या दोघांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी मोहिते यांच्यावर लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करत त्यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच यापुढे वाल्मिक कराड व मुंडे यांच्या विरोधातील बातम्या पाहिल्यास तर तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी देखील दिली. गंभीर जखमी झालेल्या अशोक मोहिते यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




