खळबळजनक…! डांबून ठेवुन तरुणीवर तीन महिने अत्याचार ; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातून की धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला फुस लावून मध्यप्रदेश येथे पळून नेऊन, तिला डांबून ठेवुन तिच्यावर साडेतीन महिने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणासह आठ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय नानासाहेब दिघे, गणेश बनसोडे, किरण भाऊसाहेब शेवकर, रवींद्र नानासाहेब दिघे, अमित बाळासाहेब जगदाळे, लता नानासाहेब दिघे, सोनाली नितीन वाकचौरे, कल्याण लक्ष्मण तावरे (सर्व राहणार तळेगाव दिघे, तालुका संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात ग्रामीण भागातील तरुणी शिक्षण घेत होती. तिची अक्षय नानासाहेब दिघे याचेशी ओळख झाली. दोघात मैत्री झाल्याने हा तरुण तरुणीच्या घरी नेहमी येत जात होता. २७ डिसेंबर २०२४ रोजी अक्षयने ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला महाविद्यालयातून पळवून नेले. त्या तरुणीला मध्यप्रदेश एका गावातील घरात डांबून ठेवून जबरदस्तीने अत्याचार केले.
यावेळी तरुणीने मला घरी जायचंय, मला सोडा असे म्हणून विनवण्या केल्या. मात्र तरुणाचे नातेवाईक मित्रांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन तरुणीला मारहाण करून शिवीगाळ केली व घरच्यांना सांगितल्यास तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. यातील दोघा मित्रांनी आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने मध्यप्रदेश येथे नेले. तरुणीने पुन्हा विनवणी केली असता हे सर्व जण बारामती येथे आले.
या घटनेची सर्व माहिती तरुणीच्या घरच्यांना समजली असता २८ मार्च २०२५ रोजी तिची सुटका केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहे.





