महाराष्ट्र हादरला! प्रेयसीने पेटवलेल्या प्रियकराचा ‘व्हॅलेंटाईने डे’ दिवशीच मृत्यू

नाशिक – लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने प्रियकराला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणरे गावात घडली आहे. रविवारी रात्री उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. गोरख बच्छाव असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी त्याला पेटवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मुलीसह तिचे आई, वडील आणि भाऊ यांना अटक केली आहे. कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३), गोकुळ तोगल सोनवणे (वय ५७), निर्मला सोनवणे (वय ५२), हेमंत सोनवणे (वय ३०) आणि प्रसाद सोनवणे (वय १८) अशी तरुणाला जिवंत जाळणाऱ्या संशयितांची नावे आहेत.
लोहणेर येथील मोबाईल दुकानासमोर दुपारी दिड वाजेच्या सुमारास गोरख उभा होता. यावेळी संबंधित मुलगी आणि तिचे कुटुंब यांनी तेथे गोरखला मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. या घटनेत जवळपास 55 टक्के गंभीररित्या भाजलेल्या गोरखला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने रविवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेच्या निषेधार्थ लोहोणेरच्या गावकऱ्यांनी सोमवारी गावात कडकडीत बंद पुकारला, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गावात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले, या प्रकरणातील आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र समाजात बदनामी होईल या भितीने मुलीच्या घरच्यांचा त्याला विरोध होता, आधी एक लग्न मोडले होते त्यास गोरख कारणीभूत होता. त्याने संबंधित मुलाला काही फोटो देखील दाखवले होते. आणि याचाच राग आरोपींच्या डोक्यात होता. गोरखला मारहाण करण्यात आली. तसेच पेट्रोल ओतून पेटून देण्यात आले होते.
मयत गोरख बच्छाव हा प्लम्बिंगचा व्यवसाय करत असे. त्याचे आणि मालेगाव जवळील रावळगावमध्ये राहणारी कल्याणी सोनवणे यांच्यात जवळपास 7 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र समाजात बदनामी होईल या भितीने मुलीच्या घरच्यांचा त्याला विरोध होता.





