युवा भारत आता होतोय वृध्द ! तरूण लोकसंख्येचे सरासरी वय २४ वरून आता २९ वर; अहवालामुळे चिंता वाढली

India Fourth Youngest Country – भारत हा जगातील चौथा तरुण देश मानला जातो. याचा अर्थ तरूणांच्या संख्येबाबत भारत चौथ्या स्थानावर आहे. या यादीत पहिला क्रमांक आफ्रिकन देश नायजेरियाचा आहे. दुसरा क्रमांक फिलिपीन्सचा आणि तिसरा क्रमांक बांगलादेशचा आहे. 140 कोटी लोकसंख्येचा भारत देश आपल्या युवा कार्यशक्तीमुळे जगात प्रसिद्ध आहे.
दरम्यान, एका नव्या अहवालामुळे काहीशी चिंता वाढली आहे. देशातील तरूणांची संख्या कमी होत असल्याचे हा अहवाल सूचित करतो आहे. भारतातील तरुण लोकसंख्येचे सरासरी वय जे 24 वर्षे होते ते आता 29 वर्षे झाले आहे. 2024 मध्ये, देशाच्या लोकसंख्येचा वाढीचा दर 1% पर्यंत पोहोचेल, जो 1951 नंतरचा सर्वात कमी आहे.
तेंव्हा म्हणजे 1951 मध्ये वाढीचा हा दर 1.25% होता. तर 1972 मध्ये सर्वोच्च पातळीवर म्हणजे 2.2% होता. 2021 मध्ये वृद्धांची संख्या वाढीचा दर 1.63 टक्के होता. देशात या अगोदरची जनगणना 2011 मध्ये झाली होती. त्या काळात देशाची लोकसंख्या १२१.१ कोटी होती. ही लोकसंख्या आता सुमारे १४२ कोटी झाली आहे. एसबीआयच्या लोकसंख्येवरील ताज्या संशोधन अहवालात हे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
वृद्ध लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ
60 वर्षांवरील लोकांची संख्या 2050 पर्यंत 347 दशलक्षांपर्यंत पोहोचेल.
वृद्ध लोकांची संख्या 2036 पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 12.5% होईल.
2050 पर्यंत ही संख्या 19.4% पर्यंत पोहोचेल.
2010 मध्ये वृद्धांची संख्या 91.6 दशलक्ष होती.
40 टक्के वृद्ध लोकसंख्या गरिबी रेषेच्या खाली आहे
18.7 टक्के वृद्ध लोकांकडे उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत नाही.
वृध्दांना मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.





