Pushkar Jog : महाराष्ट्रात 15-15 कोटी कमावता आणि मराठी शिकता येत नाही?; बॉलिवूड अभिनेत्यांना वर पुष्कर जोगचा संताप
मोठ्या पुरस्कार सोहळ्यांपासून ते चित्रपटांच्या प्रदर्शनापर्यंत अनेकदा मराठी कलाकार आणि सिनेमांना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची खंत कलाकारांकडून व्यक्त केली जाते.

Pushkar Jog : मराठी भाषा, मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटसृष्टीला मिळणारी दुय्यम वागणूक हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मोठ्या पुरस्कार सोहळ्यांपासून ते चित्रपटांच्या प्रदर्शनापर्यंत अनेकदा मराठी कलाकार आणि सिनेमांना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची खंत कलाकारांकडून व्यक्त केली जाते.
आता अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग याने याच मुद्द्यावर पुन्हा एकदा अत्यंत परखड भाष्य केलं आहे. मराठी चित्रपटांची खरेदी, वितरण आणि प्रदर्शन यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेत मराठी माणूसच नसल्याचा दावा करत त्याने इंडस्ट्रीतील व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
‘मराठी सिनेमा एखाद्या दुर्लक्षित मुलासारखा झाला आहे’, असं म्हणत पुष्करने आपली नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या बॉलिवूड कलाकारांनी महाराष्ट्राची आणि मराठी भाषेचीही जाणीव ठेवायला हवी, असं म्हणत त्याने जोरदार टोला लगावला.
पुष्कर जोग नुकताच एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. यावेळी मराठी चित्रपटांना मिळणारी वागणूक, फिल्म इंडस्ट्रीतील निर्णयप्रक्रिया आणि मराठी कलाकारांची परिस्थिती यावर त्याने मनमोकळेपणाने भाष्य केलं. ‘आम्ही ज्या लोकांना फिल्म्स विकतो, तिकडे एकही मराठी माणूस नाही,’ असं म्हणत त्याने आपल्या अनुभवातून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.
पुष्कर म्हणाला की, चित्रपट कोण खरेदी करणार, कोणत्या सिनेमाला प्राधान्य मिळणार, याचा निर्णय घेणाऱ्या पातळीवर मराठी माणसाचं प्रतिनिधित्वच कमी आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मची नावं घेण्याचं टाळत त्याने तिथल्या निर्णयप्रक्रियेबाबत उदाहरण दिलं.
“एक बंगाली बाई आहे, एक माणूस आहे. त्या बाईला पुष्कर जोग माहिती नाही. ती माझी फिल्म कशी घेईल? साधी गोष्ट आहे,” असं तो म्हणाला. त्याच्या या वक्तव्यातून केवळ वैयक्तिक नाराजी नव्हे, तर मराठी सिनेमांच्या मार्केटिंग आणि वितरण व्यवस्थेबाबतचा मोठा प्रश्न समोर येतो.
‘मराठी सिनेमा दुर्लक्षित मुलासारखा झाला आहे’
पुष्करने पुढे राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेचाही संदर्भ दिला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत, शहरांचा विस्तार होत आहे, विकासाचा वेग वाढत आहे; मात्र या बदलांमध्ये स्थानिक मराठी माणूस आणि त्याच्या सांस्कृतिक ओळखीचा विचार कितपत होतो, असा सवाल त्याने उपस्थित केला.
“आपण मत देणार, मंत्र्यांना बोलणार. मंत्री म्हणणार आम्ही काय करू?” असं म्हणत त्याने व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले. बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या, महाराष्ट्रातील बदल आणि त्याचा स्थानिकांवर होणारा परिणाम याबाबतही त्याने आपली भूमिका स्पष्ट केली.
‘महाराष्ट्रातून कोट्यवधी कमावता, मग मराठी शिकता येत नाही?’
पुष्करचा संताप यानंतर बॉलिवूड कलाकारांकडे वळला. आज मला सांगा बॉलिवूडचे पाच ते सहा कलाकार आहेत. मला नावं नाही घ्यायची. इथे येऊन कोट्यवधी रुपये कमावतात. एका-एका सिनेमाचा 10-15 कोटी रुपये घेतात. कुठून घेता? महाराष्ट्रातून घेता ना.
निर्माता कुठे आहे महाराष्ट्रात आहे. 15 कोटी तुम्ही एका फिल्ममधून कमावता मग तुम्हाला या राज्यात मराठी शिकता येत नाही? 15-15 कोटी कमावता तुम्ही आणि मराठी शिकता येत नाही? लाजा नाही वाटत तुम्हाला? प्लस तुम्ही मराठी कलाकारांना कमी लेखता. आपण दादागिरी करायची आणि मराठीतच बोलायचं.
मैं नही बोलूंगा मराठी जो करना है करो हे जिथे बोलतील ना तिथे गप्प नाही राहायचं. हे माझं राज्य आहे लोकांना हे का कळत नाही. आपल्याला इथे येऊन धडे शिकवलेले चालतील का? हे बोलल्यानंतर मला जे काही ट्रोल करतील करु दे. मला बोलण्याचा अधिकार आहे. अशा शब्दांत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली.
‘बॉलिवूड आणि मराठी सिनेमा एकाच ठिकाणी असल्याचा फटका’
मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसल्याच्या प्रश्नावरही पुष्करने भाष्य केलं. त्याच्या मते, मराठी आणि बॉलिवूड सिनेमांचं मुख्य केंद्र एकच म्हणजे मुंबई असल्यामुळे मराठी चित्रपटांना त्याचा फटका बसतो. “बॉलिवूड आणि मराठी सिनेमे दुर्दैवाने एकाच ठिकाणी मुंबईत आहेत. त्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे थिएटर मिळत नाही, हे नेहमीचं रडगाणं आहे,” असं त्याने म्हटलं.
मराठी चित्रपटांना थिएटर, स्क्रीन, प्रेक्षक आणि आर्थिक पाठबळ मिळण्याच्या प्रश्नावर पुष्कर याआधीही भाष्य करत आला आहे. २०२२ मध्ये ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानेही त्याने मराठी सिनेमांना स्क्रीन मिळवताना कराव्या लागणाऱ्या संघर्षाबद्दल भाष्य केलं होतं.
दरम्यान, मराठी प्रेक्षकच मराठी सिनेमांना पुरेसं प्राधान्य देत नाहीत, अशी खंतही पुष्करने २०२४ मध्ये व्यक्त केली होती. त्यामुळे त्याच्या ताज्या वक्तव्याकडे केवळ भाषेचा मुद्दा म्हणून न पाहता मराठी चित्रपटांच्या निर्मितीपासून ते विक्री, वितरण, ओटीटी आणि थिएटरपर्यंतच्या संपूर्ण व्यवस्थेवर केलेली टिप्पणी म्हणून पाहिलं जात आहे.






