पुणे | खंडित वीजपुरवठ्याला तुम्हीच जबाबदार..!

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील विविध पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याने महापालिकेने महावितरणच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर प्रश्न उपस्थित केला होता.
त्यानंतर महावितरणकडून खंडित पुरवठ्यास पालिकाच जबाबदार असल्याचे कळविले. मात्र, महावितरणचा हा दावा महापालिकेने खोडून काढला असून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खंडित वीजपुरवठ्याची यादीच सादर केली आहे.
या दोन महिन्यांत २७१ वेळा पाणीपुरवठा केंद्राची वीज गायब झाली असून, त्यात महापालिकेच्या बिघाडामुळे अवघ्या २१ वेळा वीज खंडित झाली आहे, तर उर्वरीत बिघाड महावितरणकडून झाल्याचे नमूद केले आहे.
महावितरणने वीजवाहिन्यांची नियमित देखभाल दुरुस्ती केल्यास ही वेळ उद्भवणार नाही, असे महापालिकेने म्हटले आहे. महापालिकेची शहरात १३ जलशुध्दीकरन केंद्र तसेच पंपिश स्टेशन आहेत.
पाच मिनिटांचा खंड; दीड तासांचा फटका
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जलशुद्धीकरण केंद्र, तसेच पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी पाच मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला, तरी त्याचा फटका पुढील दोन तासांसाठी बसतो. सर्व यंत्रणा सुरू होण्यास १५ ते २० मिनिटांचा कालावधी जातो.
त्यान्ंतर टाक्यांची पाण्याची पातळी भरणे, तसेच पंपिंगसाठी वेळ जातो. परिणामी जलकेंद्रात उशीर झाल्याने पुढे पाण्याच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. त्यामुळे नागरिक, तसेच लोकप्रतिनिधींच्या रोषाचा महापालिकेस सामना करावा लागतो.
दोन महिन्यांत २१ वेळा जॅकवेल बंद
महावितरणने केलेल्या खुलाशात खडकवासला जॅकवेल येथे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ६ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या दोन महिन्यांत तब्बल २१ वेळा वीजपुरवठा खंडीत झाला होता.
त्यात जुलै मध्ये ९ वेळा तर ऑगस्ट मध्ये १२ वेळा खंडित झाला होता. खडकवासला धरणातून जॅकवेलमधून पाणी थेट पर्वती आणि वारजे जलकेंद्रांत आणले जाते. त्यामुळे या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शहराच्या पुरवठ्यावर होतो.
प्रमुख जलकेंद्रातील बिघाड
जलकेंद्र ……………( जुलै आणि ऑगस्ट )
– पद्मावती पंपिंग : ३६ वेळा
– भामा- आसखेड जलकेंद्र : ३५ वेळा
– राजीव गांधी पंपिंग (कात्रज) : ५० वेळा
– वडगाव जलकेंद्र – ६ वेळा
– खडकवासला जॅकवेल – २१ वेळा
– लष्कर जलकेंद्र – ४२ वेळा
– चिखली – १५ वेळा
– इतर – ७६ वेळा
महावितरणने त्यांच्या यंत्रणेची नियमित देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ती होत नसल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, नागरिकांच्या रोषाचा सामना महापालिकेस करावा लागतो,
तसेच त्यांनी केलेला दावाही चूकीचा असून, महापालिका आपल्या वीज यंत्रणेची नियमित देखभाल करते. त्यामुळे त्यांना किती वेळा वीजपुरवठा खंडित झाला, याची आकडेवारीच पाठविण्यात आली आहे. – नंदकिशोर जगताप (पाणीपुरवठा विभागप्रमुख)





