Interrupted power supply : खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
Interrupted power supply : मुसळधार पावसाने वीज व्यवस्था कोलमडली

Dehu Road : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे देहूरोड परिसरातील वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. सलग तीन ते चार दिवस वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वीजपुरवठा सुरळीत नसल्याने घरगुती कामकाज, पाणीपुरवठा, शिक्षण, व्यावसायिक व्यवहार आणि लघुउद्योगांवर मोठा परिणाम झाला. देहूरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडणे, वीजवाहिन्यांवर फांद्या कोसळणे, तांत्रिक बिघाड निर्माण होणे आणि वीज वितरण यंत्रणेवर ताण वाढणे अशा घटना घडल्या. त्यामुळे अनेक भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. काही भागांत दीर्घकाळ वीज नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.
व्यावसायिक क्षेत्रालाही या वीजखंडितीचा मोठा फटका बसला आहे. पीठ आणि मसाला गिरण्या, झेरॉक्स केंद्रे, ई-सेवा केंद्रे, संगणक सेवा केंद्रे, बँकिंग व्यवहार, लघुउद्योग आणि विविध व्यावसायिक आस्थापनांचे कामकाज वारंवार बंद ठेवावे लागत आहे. वीजेवर अवलंबून असलेल्या अनेक व्यवसायांना सलग खंडित पुरवठ्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
नागरिकांनी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाशी वारंवार संपर्क साधून तक्रारी नोंदविल्या. मात्र, प्रत्येकवेळी पावसामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे कारण सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. अनेक ठिकाणी तासन्तास वीजपुरवठा बंद राहूनही कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली.
पाणीपुरवठ्यालाही फटका
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याला बसला आहे. अनेक सोसायट्या आणि वसाहतींमध्ये मोटारी बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. घरगुती कामे रखडली असून स्वयंपाक, धुणीभांडी आणि इतर दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण झाले. अनेक नागरिकांना पर्यायी व्यवस्था करून दिवस काढावा लागला.
इंटरनेट सेवा बंद
वीज नसल्याने मोबाइल चार्जिंग, इंटरनेट सेवा आणि ऑनलाइन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला. घरातून काम करणाऱ्या नोकरदारांना अडचणींचा सामना करावा लागला, तर विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अभ्यासावर आणि परीक्षेच्या तयारीवर परिणाम झाला.
Moshi building collapse: मोशी कचरा डेपो दुर्घटना : नऊ जणांना वाचवले, एकाचा मृत्यू





