satara | विजेच्या लपंडावामुळे सातारकर संतप्त

सातारा, (प्रतिनिधी)- सातारा शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असून त्रस्त झालेले नागरिक संतप्त झाले आहेत. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या दैनंदिन कामकाजासह सदनिकांमध्ये पाण्याच्या टाकीत पाणी चढवणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे दिवसभरात अधूनमधून गायब होणाऱ्या विजेने सातारकर हैराण झाले आहेत.
सध्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे खांब पडणे, वायर तुटणे यामुळे वीज जाणे असे प्रकार घडत आहेत. परंतु सातारा शहर परिसरात ढग अंधारून आले की लगेच वीज घालवली जात आहे.
एकदा वीज गेली की किमान ती अर्धा ते पाऊण तास गायब होत असल्याने नागरिकांची उष्म्यामुळे काहीली होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून रात्री बारानंतर किमान अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरात सातत्याने वीजपुरवठआ खंडीत होतो.
पुन्हा सुरु होतो पुन्हा बंद होत आहे. विजेच्या या लपंडावाबाबत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता केवळ तांत्रिक बिघाड असे सरकारी छापाचे उत्तर देऊन ते वेळ मारून नेत आहेत.
खंडित वीजपुरवठयाचा फटका शहरातील पाणी वितरणाला बसत आहे. बोगदा, शनिवार पेठ, सदरबझार, कूपर कॉलनी येथील मोठया अपार्टमेंटमध्ये ग्राउंड लेव्हलच्या टाकीचे पाणी छतावरील टाकीत पोहचू शकत नाही. परिणामी नागरिकांच्या सकाळच्या सत्रातील कामांचा खोळंबा होत आहे .
काल सायंकाळी पावणेसातला गेलेली पावणे नऊला आली. दिवसभरात किमान तीन ते चार वेळा वीज गायब होत असून यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक कामे ठप्प होत आहेत. वीजपुरवठा बंद झाला की वीज कंपनीच्या राजवाडा कार्यालयाचा फोन काढून ठेवला जातो.
येथे कोणतेही कर्मचारी उत्तर देण्यासाठी उपलब्ध नसतात. वीज वितरणच्या कारभाराची अवकाळी पावसात ही अवस्था असेल तर पावसाळ्यात काय होईल,सा प्रश्न उपस्थित होत आहे.
कंपनीने तातडीने या संदर्भात सुधारणा करावी नाही तर नागरिक कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढतील अशी स्थिती आहे. विज वितरण कंपनीच्या या कारभाराविरोधात आंदोलनाची तयारी सुरू केली आहे, असे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.





