धोनीने केवळ स्वार्थ साधला; योगराजसिंग पुन्हा गरजले

चंदीगड – सिक्सरकिंग युवराजसिंग याचे वडील व माजी कसोटीपटू योगराजसिंग यांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीवर तोफ डागली आहे. संघातील नवोदितांसाठी धोनीने काहीही केले नाही केवळ स्वतःची प्रसिद्धी व कौतुक व्हावे यासाठी तो सतत हपापलेला दिसला आहे, अशा शब्दात योगराज यांनी धोनीवर पुन्हा तोफ डागली आहे.
माजी कर्णधार धोनी व सध्याचा कर्णधार विराट कोहली या दोघांनी माझ्या मुलाचा म्हणजेच युवराजसिंगचा विश्वासघात केला, त्याच्या पाठीत खंजीर खुपसला व त्याच्या कारकीर्दीची वाट लावली असा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्याला चोवीस तासही होत नाहीत तोपर्यंत त्यांनी पुन्हा एकदा धोनीला लक्ष्य केले आहे.
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनीने काय केले. नवोदितांना त्याने काय दिले. संघात अनेक असे खेळाडू होते की त्यांच्याकडे अफाट गुणवत्ता होती पण धोनीने त्यांना कधीच सहकार्य केले नाही. उलट आपल्याच पसंतीच्या खेळाडूंना संघात स्थान मिळावे यासाठीच तो आग्रही असायचा. संघातील युवा खेळाडूंना संभाळून घेण्याचे कसब जसे माजी कर्णधार म्हणून सौरव गांगुलीकडे होते तिथे धोनी कमी पडला. त्याने सातत्याने आपल्या लाडक्या खेळाडूंची तळी उचलली, असेही मत योगराज यांनी व्यक्त केले.
धोनी जेव्हा देशांतर्गत स्पर्धेत खेळत होता तेव्हापासून मी त्याचा खेळ पाहात आहे. त्याच्या दृष्टिकोनावर तेव्हाच नव्हे तर आजही मला शंका आहे. संघाच्या यशापेक्षाही जास्त त्याला त्याच्या कामगिरीची चिंता असते. आपल्यालाच सगळे श्रेय मिळावे यासाठीच तो प्रयत्नशील असतो. माझा मुलगा योयो चाचणी पास झाल्यानंतरही केवळ धोनी व कोहलीमुळेच त्याला संघात स्थान मिळाले नाही. युवराजकडे किमान 2 वर्षांचे क्रिकेट शिल्लक होते. त्याला मैदानावर निवृत्ती घेता यावी अशी संधीही या दोघांनी मिळू दिली नाही, अशीही टीका योगराज यांनी केली आहे.
योगराज यांनी यापूर्वी देखील सातत्याने धोनीला टीकेचे लक्ष्य केले आहे. जेव्हा 2011 सालची विश्वकरंडक स्पर्धा भारताने जिंकली होती त्यानंतरही त्यांनी हा विजय सांघिक असल्याचे सांगत धोनीचा उल्लेख टाळला होता. तसेच आता त्यांनी पुन्हा एकदा धोनीलाच लक्ष्य करताना तो स्वार्थी असल्याचे सांगितले आहे.





