योगींनी मंत्र्यांसमवेत पाहिला द केरळ स्टोरी चित्रपट
Updated On:

लखनौ – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी मंत्र्यांसमवेत द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहिला. योगी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपट पाहण्यासाठी काही शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनीही उपस्थित राहिले. केरळमधील सत्य घटनांवर आधारित तो चित्रपट असल्याचा दावा निर्माते आणि दिग्दर्शकांनी केला आहे.
त्यावरून राजकीय वादंगही निर्माण झाले आहे. भाजपने चित्रपटाला जोरदार पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, विरोधकांनी आणि विशेषत: कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, डाव्या पक्षांनी खोट्या दाव्यांच्या आधारावर चित्रपट बनवण्यात आल्याचा आरोप लावून धरला आहे. त्यामुळे विविध राज्यांमधील वातावरण ढवळून निघाले आहे. तृणमूलची सत्ता असणाऱ्या बंगालमध्ये त्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.





