Cabinet decision : 60 वर्षांवरील महिलांना आयुष्यभर मोफत बस प्रवास, तर तरुणांना 25 लाख टॅबलेट; यूपी कॅबिनेटचे 24 मोठे निर्णय
Cabinet decision : योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील यूपी कॅबिनेट बैठकीत 24 प्रस्तावांना मंजुरी. 60 वर्षांवरील महिलांना मोफत बस प्रवास, 25 लाख टॅबलेट, 250 इलेक्ट्रिक बस आणि गंगा एक्स्प्रेसवे हरिद्वारपर्यंत.

Cabinet decision : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 24 महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. ज्येष्ठ महिला, युवक आणि औद्योगिक विकासाशी संबंधित अनेक मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. त्यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या बसमधून आयुष्यभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.
तरुणांसाठीही सरकारने मोठी घोषणा केली असून, स्वामी विवेकानंद युवा सशक्तीकरण योजनेअंतर्गत 25 लाख मोफत टॅबलेट देण्यात येणार आहेत. यासाठी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 2,374.60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
60 वर्षांवरील महिलांचा बसप्रवास मोफत –
योगी सरकारने लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या बसमधून आयुष्यभर मोफत प्रवास करता येणार आहे. परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांच्या माहितीनुसार, या निर्णयाचा राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना फायदा होण्याची शक्यता आहे.
रक्षाबंधनपूर्वी महिलांसाठी हा सरकारचा मोठा निर्णय मानला जात आहे. मोफत प्रवासासाठी महिलांना वयाचा पुरावा दाखवावा लागणार असून, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्राचा वापर करता येणार आहे.
425 कोटींमध्ये 250 इलेक्ट्रिक बस –
मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी 250 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली. यामध्ये 42 आणि 52 आसनी बसांचा समावेश असेल. या बस खरेदीसाठी सुमारे 425 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
सुलतानपूरमध्ये 272 कोटींचा औद्योगिक क्लस्टर –
सुलतानपूरमध्ये 272.25 कोटी रुपयांच्या खर्चातून इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग अँड लॉजिस्टिक्स क्लस्टर विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्वांचल एक्स्प्रेसवेच्या परिसरात हा प्रकल्प उभारला जाणार असून, औद्योगिक कॉरिडॉर योजनेअंतर्गत आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील.
या प्रकल्पासाठी जागतिक निविदा प्रक्रियेद्वारे बांधकाम संस्थेची निवड केली जाणार आहे. या क्लस्टरमुळे परिसरात उद्योगांना चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
गंगा एक्स्प्रेसवे थेट हरिद्वारपर्यंत –
योगी मंत्रिमंडळाने गंगा एक्स्प्रेसवेचा विस्तार हरिद्वारपर्यंत करण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील दिला आहे. या विस्तारासाठी सुमारे 10,761 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे बिजनौर ते हरिद्वार दरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे.
या प्रकल्पामुळे प्रयागराज आणि हरिद्वार या दोन्ही प्रमुख कुंभनगरींना वेगवान आणि नियंत्रित प्रवेशमार्गाने जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
तरुणांना 25 लाख मोफत टॅबलेट –
स्वामी विवेकानंद युवा सशक्तीकरण योजनेअंतर्गत राज्यातील तरुणांना 25 लाख मोफत टॅबलेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2026-27 साठी या योजनेला 2,374.60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तरुणांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम करणे, तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींसाठी त्यांना तयार करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि आरोग्य शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना पाच वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.





