Yogi Adityanath: रामाच्या नावाचा जयघोष अन् मांसाहाराची मेजवानी ; मुख्यमंत्री योगींनी काँग्रेसला सुनावले
Yogi Adityanath: उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे आयोजित 'भाव समर्पण सोहळ्या'त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे आयोजित ‘भाव समर्पण सोहळ्या’त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. अयोध्येत उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांच्या कथित मासळी मेजवानीच्या वादावर भाष्य करत योगींनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, काँग्रेसचे नेते हनुमानगढीला दर्शनासाठी जातात आणि त्यानंतर माशांची मेजवानी करतात आणि ते राम-रामचा जयघोष करतात, पण निर्लज्जपणालाही काही सीमा असते,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
योगी आदित्यनाथ म्हणाले, “हनुमानगढीला जाण्यासाठी कोणी विरोध केला नाही. पण मासे खायचे असतील तर अयोध्येबाहेर जाऊन खाऊ शकला असता. ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. बजरंगबलीच्या मंदिरात नतमस्तक होण्याचे नाटक करायचे आणि त्यानंतर मासे खाण्यासाठी बाहेर पडायचे, ही त्यांची वृत्ती आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी योगींनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवरही निशाणा साधला. त्यांच्या भावाच्या हत्येप्रकरणातील आरोपी माफियाविरोधात ठाम भूमिका न घेता संबंधित नेते त्याच्यासमोर नतमस्तक झाल्याचा आरोप त्यांनी केला.
‘उत्तर प्रदेशातील ओळखीचे संकट संपले’
विरोधकांवर टीका करताना योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील बदललेल्या परिस्थितीचाही उल्लेख केला. “आज उत्तर प्रदेशातील तरुण, महिला, व्यापारी, शेतकरी किंवा सामान्य नागरिकाला आपल्या ओळखीच्या संकटाचा सामना करावा लागत नाही. मात्र, दहा वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती,” असे ते म्हणाले. समाजवादी पक्ष, बसपा आणि काँग्रेसच्या कारभारावर टीका करत त्यांनी पूर्वीच्या सरकारांवर उत्तर प्रदेशाची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला.
अयोध्येच्या विकासावरूनही विरोधकांना सवाल
योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील विविध विकासकामांवरूनही विरोधकांना लक्ष्य केले. अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आल्याचे, निषादराज यांच्या नावाने विश्रामगृह उभारल्याचे आणि शबरी मातेच्या नावाने उपाहारगृह सुरू केल्याचे विरोधकांना दुःख का होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“तुमच्यात क्षमता नव्हती, त्यामुळे तुम्ही हे करू शकला नाहीत. आमच्याकडे क्षमता होती. आम्ही आपल्या वारशाचा आणि प्रभू रामाचा सन्मान केला तसेच भव्य राम मंदिराच्या उभारणीत योगदान दिले, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.





