Yogi Adityanath : मुन्ना भाई गँग.! योगी आदित्यनाथांचा सपावर जोरदार हल्लाबोल; भ्रष्टाचार आणि बेरोजगारीवरून निशाणा
2017 पूर्वी राज्यात कोणतीही भरती प्रामाणिकपणे होत नव्हती, त्यामुळे आज येथे उपस्थित असलेल्या उमेदवारांना त्या काळात नियुक्ती पत्र मिळाले नसते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Yogi Adityanath – लखनौ येथे यूपीएसएसएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या 1,594 उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टी आणि मागील सरकारांवर जोरदार टीका केली. 2017 पूर्वी राज्यात भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार आणि भाई-भतीजावाद चालत होता, असा आरोप करत त्यांनी सपा नेतृत्वावर मुन्ना भाई गँग म्हणत अप्रत्यक्ष टोला लगावला.
2017 पूर्वी राज्यात कोणतीही भरती प्रामाणिकपणे होत नव्हती, त्यामुळे आज येथे उपस्थित असलेल्या उमेदवारांना त्या काळात नियुक्ती पत्र मिळाले नसते, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच 30 लाख नोकऱ्या देण्याच्या सपाच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्तेत असताना काय केले, असा सवाल त्यांनी केला.
साडेनऊ वर्षांत उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था 12.5 लाख कोटींवरून 36 लाख कोटींवर पोहोचल्याचा दावा करत, पुढील आठवड्यात 50 हजार तरुणांना नियुक्ती पत्र देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. गोमती रिव्हर फ्रंट प्रकल्पाचा दाखला देत 167 कोटी रुपयांच्या बजेटऐवजी 1400 कोटी रुपये खर्च होऊनही योजना अपूर्ण राहिल्याचा आरोप त्यांनी केला.
2017 पूर्वी राज्याची ओळख ‘उपद्रव प्रदेश’ अशी होती आणि गुंतवणूकदारांसमोर सुरक्षेचे संकट होते, असे सांगत आता नोएडा-ग्रेटर नोएडा हे गुंतवणुकीचे मोठे केंद्र बनल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि चुकीच्या कामास नकार देण्याचे आवाहनही त्यांनी केले.






