satara | मायणीच्या भारतमाता विद्यालयात योग दिन उत्साहात

मायणी (प्रतिनिधी)- शरीर, मन, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिले जाते. आज जगभर जागतिक योग दिवस साजरा होत असतो. मानव सुदृढ आणि सशक्त राहवा म्हणून 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्यात येतो.
त्यानिमित्त येथील मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारतमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या योग दिनात हजारो विद्यार्थ्यांनी योगासन सादर केली.
यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उभ्या, बैठ्या आणि निद्रा स्थितीतील ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मक्रासन,
सेतुबंधासन, शवासन, प्राणायामातील कपालभाती, अनुलोम- विलोम, भ्रामरी, ध्यान आदी योगासनांचे प्रकार केले. मानव जातीच्या कल्याणासाठी ॠषीमुनींनी प्राणायमांचा आविष्कार केला. ताणतणांवाचे प्राणायमाच्या माध्यमातून व्यवस्थापन करता येते. ध्यानधारणेतून मनुष्य जीवनाचे रहस्य, उद्देश जाणून घेता येतो, अशी शिकवण यावेळी देण्यात आली.
भारतमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या हजारो विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहात योगासने केली. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्रीमंत कोकरे, सुभाष माळी, महेश जाधव, उदय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांची प्रात्यक्षिके करुन दाखविली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पिसाळ, उपप्राचार्य संजय काळे, उपमुख्यध्यापक महेश तांबवेकर, पर्यवेक्षक बाळकृष्ण गुरव, धोंडीराम थोरात सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.





