पुणे जिल्हा | योग साधनेतून आरोग्यही उत्तम राहते

मंचर, (प्रतिनिधी) – योग साधनेतून मानसिक कणखरपणा येऊन आरोग्यही उत्तम राहते.योगासनामुळे विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता वाढून बौद्धिक व सर्वागीण विकास होण्यास चालना मिळते.सशक्त व बलशाली देश होण्यासाठी योग महत्त्वाचा असल्याचे मत राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष थोरात यांनी व्यक्त केले .
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन विविध प्रात्यक्षिकांसह उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेत योगाबाबत माहिती देणाऱ्या प्रबोधनात्मक व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी ताडासन,वृक्षासन,चक्रासन,पद्मासन,पर्वतासन,वज्रासन ही आसने व श्वसनासाठी कपालभारती,अनुलोम-विलोम इत्यादींची प्रात्यक्षिके करून घेतली. ही योग प्रात्यक्षिके करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद दिला तसेच वर्षभर रोज योगासने करण्याचा संकल्प केला.





