Pune News : वीस वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद; येरवडा पोलिसांची बीड जिल्ह्यात कारवाई
Pune News : २० वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या फरार आरोपीला येरवडा पोलिसांनी बीड जिल्ह्यातील परळी येथून शिताफीने अटक केली आहे.

Pune News : अपहरण आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात गेल्या वीस वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी बीड जिल्ह्यातील परळी येथून अटक केली. नझीर मुस्तफा खान (वय ४६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो वारंवार राहण्याचे ठिकाण आणि मोबाईल क्रमांक बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. (Pune News)
येरवडा पोलीस ठाण्यात २००६ मध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३६६ (अ) आणि ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. त्याच्याविरोधात न्यायालयाने फरार असल्याबाबत जाहीरनामाही प्रसिद्ध केला होता. (Pune News)
दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिले होते. (Pune News)
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू होता. सुरुवातीला आरोपी जालना जिल्ह्यातील अंबड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, तेथे शोध घेऊनही तो सापडला नव्हता. (Pune News)
त्यानंतर तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जायभाय आणि साईनाथ मस्के यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी सध्या बीड जिल्ह्यातील परळी येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. (Pune News)
गवंडीकाम करून बदलत होता ठिकाण
पोलिसांच्या तपासात आरोपी पुण्यातील सय्यदनगर, हडपसर, जालना जिल्ह्यातील अंबड, बीड जिल्ह्यातील परळी व माजलगाव आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे वास्तव्य करून गेल्याचे समोर आले. तो दोन ते तीन दिवस गवंडीकाम करायचा आणि त्यानंतर कामाचे तसेच राहण्याचे ठिकाण बदलायचा. त्याने मोबाईल क्रमांकही वारंवार बदलले होते. एवढेच नव्हे, तर तो स्वतःच्या भावासह इतर नातेवाइकांच्या संपर्कातही राहत नव्हता. (Pune News)
मिळालेल्या माहितीच्या आधारे येरवडा पोलिसांच्या पथकाने परळी पोलिसांची मदत घेत सापळा रचला. आरोपीवर पाळत ठेवून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला पुढील तपासासाठी येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. (Pune News)
पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक शारदा कोकाटे आणि केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (Pune News)
तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड यांच्यासह पोलीस अंमलदार संदीप जायभाय, साईनाथ मस्के आणि इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत. (Pune News)
Pune News : धावत्या शिवाई ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव बचावला





