पुणे | येरवडा मेट्रो स्थानक ते पुणे विमानतळ फिडर सेवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – येरवडा मेट्रो स्थानक सुरू झाल्यामुळे पीएमपीकडून रामवाडी ते पुणे विमानतळ दरम्यानची फिडर सेवा बंद करून येरवडा मेट्रो स्थानक ते पुणे विमानतळ अशी फिडर सेवा सुरू करण्यात आली आहे.
प्रत्येक अर्धा तासांनी ही बससेवा सुरू असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.
वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा मेट्रो स्टेशन दोन दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. येरवडा मेट्रो स्थानकापासून पुणे विमानतळासाठी सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी फीडर बस सुटणार आहे. त्यानंतर प्रत्येकी अर्धा तासाला पुणे विमानतळासाठी बससेवा सुरू असणार आहे.
शेवटची बस रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. तर, पुणे विमानतळावरून येरवडा मेट्रो स्थानकासाठी सकाळी साडेसहा वाजता पहिली बस सुटणार आहे. तर, शेवटची बस रात्री साडेदहा वाजता असणार आहे.
पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. या बसचा मार्ग येरवडा मेट्रे स्थानक, विक्रीकर कार्यालय, नागपूर चाळ, बर्मा शेल, लोहगाव विमानतळ असा असणार आहे. यासाठी दोन बस देण्यात आल्या असून त्यांच्या दिवसाला साधारण ५२ फेऱ्या होणार आहेत. प्रवाशांनी या बस सेवेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.


